मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाला प्रवाशांच्या सेवेचा विसर पडला आहे. दरवर्षी नवीन बसेस एसटीच्या कार्यशाळेत तयार करून त्या ताफ्यात आणल्या जातात. मात्र, या वेळी नवीन बसेस एसटी कार्यशाळेत न तयार करता, बाहेरून तयार करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी चार महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. किचकट निविदा प्रक्रियेमुळे १,५00 नवीन बसेस अद्यापही एसटीत दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे जुन्या बसमधूनच एसटीचा प्रवास सुरू आहे. एसटी महामंडळाकडे १८,५00 बसेसचा ताफा आहे. यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात बसेस भंगारात काढून नवीन बसेस ताफ्यात दाखल केल्या जातात आणि काही बसेसची पुनर्बांधणीही केली जाते. नियमानुसार, १0 लाख किलोमीटर धावलेल्या किंवा ९ वर्षे धावलेल्या बसेस भंगारात काढून पूर्णत: नवीन बसेस तयार केल्या जातात. तर ७ किंवा ८ लाख किलोमीटर धावलेल्या बसेसची पुनर्बांधणी केली जाते. अशाप्रकारे, प्रत्येक वर्षी जवळपास ३ हजार बसेस ताफ्यातून बाहेर पडतात. यातील १,५00 बसेस नवीन, तर १,५00 बसेची पुनर्बांधणी करून त्या ताफ्यात दाखल करण्यात येतात. पुण्यातील एसटीच्या दापोडी, औरंगाबादमधील चिखलठाणा आणि नागपूरमधील हिंगणे येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत तीन हजार बसेसचे काम चालत होते. मात्र, एसटी महामंडळाने बस बांधण्यासाठी होणारा खर्च कमी करतानाच उत्तम दर्जाच्या १,५00 नवीन बसेस ताफ्यात आणण्यासाठी बस बाहेरून तयार करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चार महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया सुरू केली. मात्र, किचकट निविदा प्रक्रियेमुळे अजूनही नवीन बस ताफ्यात दाखल होऊ शकल्या नाहीत. बसची निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर, त्याच्या बांधणीला सुरुवात होऊन बस आतापर्यंत ताफ्यात दाखल होणे गरजेचे होते, परंतु तसे होऊ न शकल्याने, एप्रिल महिन्यापासून सुरू होणाऱ्या गर्दीच्या हंगामात पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे.
निविदेतच अडकल्या १,५00 नवीन गाड्या
By admin | Updated: February 6, 2017 03:00 IST