मुंबई : दादरमधील इंदू मिलच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी बाबासाहेबांचा १५० फुटांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रपरिषदेत दिली.नगररचना तज्ज्ञ शशी प्रभू यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार नियोजित स्मारकात बाबासाहेबांचा १५० फुटांचा पूर्णाकृती पुतळा, १४० बाय ११० फुटांचे भव्य स्तूप, अशोक चक्र, विपश्यना सभागृह आणि ५० हजार चौरस फूटांचे भव्य ग्रंथालय उभारले जाणार आहे. याशिवाय डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाची माहिती देणारे दालन, संविधान कसे घडले याचा ऐतिहासिक घटनाक्रम दाखवणारे संविधान दालन आणि सांस्कृतिक कार्यक्र मासाठी १५०० लोकांची आसनक्षमता असलेले सभागृह उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ आॅक्टोबरला सायंकाळी ४ वाजता चैत्यभूमीला भेट देतील. त्या नंतर इंदू मिल परिसरात स्मारकाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. सायंकाळी ५.३० वाजता पंतप्रधानांच्या मुख्य उपस्थितीत वांद्रे येथील बीकेसी मैदानावर सभा होईल. अध्यक्षस्थानी राज्यपाल सी.विद्यासागर राव असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, आदी उपस्थित असतील.काय काय असेल? बाबासाहेबांचा १५० फुटांचा पूर्णाकृती पुतळा, १४० बाय ११० फुटांचे भव्य स्तूप, अशोक चक्र, विपश्यना सभागृह आणि ५० हजार चौरस फूटांचे भव्य ग्रंथालय उभारले जाणार आहे. याशिवाय संविधान दालन व सभागृह उभारण्यात येणार आहे.
बाबासाहेबांचा १५० फुटांचा पुतळा
By admin | Updated: October 8, 2015 02:49 IST