पुणे : आर्थिक घोटाळ्यामुळे बहुचर्चित राहिलेल्या रुपी सहकारी बँकेचा चौकशी अहवाल चौकशी अधिकारी पणन संचालक किशोर तोष्णीवाल यांनी मंगळवारी जाहीर केला. या अहवालात घोटाळ्यासाठी १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांच्याकडून १ हजार ४९० कोटी ६१ लाख १०८ रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा अहवाल सहकार आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात येणार असून, त्यानंतर दोषींकडून वसुलीसाठीची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.चौकशी अहवालामुळे संबंधित संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अहवाल जाहीर करण्याच्या वेळेस संचालकांचे वकील, अधिकारी, कर्मचारी असे सुमारे ५० जण उपस्थित होते. अहवालात आपले नाव आहे का, ते पाहण्यासाठी या सर्वांची धावपळ सुरू होती.या अहवालात, तत्कालीन १८ संचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ जण निर्दोष ठरविण्यात आले आहेत. तत्कालीन संचालक अनंतराव कुलकर्णी यांनी सर्वाधिक १२७ कोटी ६ लाख ७४ हजार ४३८ रुपयांचा घोटाळा केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. ते हयात नसल्याने त्यांच्या वारसदारांकडून ते पैसे वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींमध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष ईश्वरदास चोरडिया यांनाही दोषी ठरविण्यात आले असून, त्यांच्यावर ३१ कोटी १७ लाख ६२ हजार ९१४ रुपयांचा घोटाळा केल्याचा ठपका आहे. दोषी १५ संचालकांपैकी ८ संचालकांनी शंभर कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा केला आहे. या सर्वांकडून ते वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पैकी काही संचालक हयात नसल्याने त्यांच्या वारसदारांकडून ते वसूल करण्यात येणार आहेत, अशी माहिती तोष्णीवाल यांनी दिली. बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक प्रकाश कुलकर्णी यांच्यासह ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
‘रुपी’चे १५ संचालक, ५४ कर्मचारी दोषी
By admin | Updated: February 3, 2016 03:43 IST