१६ गंभीर जखमी : सहा जनावरे दगावलीनागपूर : अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी दुपारनंतर विदर्भात कहर केला. वादळी पावसासह वीज कोसळून यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील महिलेसह तीन जण ठार व तीन जण गंभीर जखमी व पुसद तालुक्यात तीन जण ठार झाले. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यातीलच शेतमजूर महिला मरण पावली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात एक शेतकरी ठार होऊन त्याची पत्नी गंभीर जखमी आणि सावली तालुक्यात सहा जनावरे मृत्युमुखी पडली तर राजुरा तालुक्यात दोन महिला ठार व दोन गंभीर जखमी, बुलडाणा जिल्ह्यातही दोन महिला ठार व चार जण जखमी आणि नागपूर जिल्ह्यात उमरेड तालुक्यात तीन ठार आणि सहा जखमी झाले.नागपूर जिल्ह्यात उमरेड तालुक्यात ओमेश्वर भाऊराव अलाम (२४) व विनोद केशव सलाम (२०) दोघेही रा. चनोडा अशी मृत तरुणांची तर, सुजित सुरेश गोटे (१४, रा. चनोडा) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याच्यावर उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही शेतातून घरी परत येत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. करंभाड येथील सुलोचना श्रीराम लांजेवार (६२) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, मीना गणेश सहारे (४५), कांता अर्जुन हटवार (६२), ज्योती वसंत हटवार (४५), चंद्रकला अर्जुन हटवार (३५) सर्व रा. बाभूळवाडा व मनीषा भारत मसरकोल्हे (१७) रा. निंबा या पाच महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना नगापूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील घटनेत गजानन रामचंद्र जाधव (२४), संतोष राघो दातकर (३०) रा. करंजखेड आणि रेखा विलास शिंदे (४०) रा. काळीटेंभी ता. महागाव, व पुसद तालुक्यात वत्सलाबाई संभाजी शेळके (४०) रा. धनज, किशोर रामप्रसाद राठोड (१८) रा. माळआसोली, तुकाराम सखाराम पवार (५५) रा. माणिकडोह अशी मृतांची नावे आहे. तर मारोती तुकाराम जाधव (४५), बाबाराव कानबा बोरकर (४५) रा. करंजखेड आणि सुमन दिगंबर वानखेडे रा.काळी टेंभी, माधवराव पंडागळे (६०) पांढुर्णा केदारलिंग ता. पुसद अशी जखमींची नावे आहे. करंजखेड येथील दत्तराव भांगे यांच्या शेतात मजूर गुरुवारी दुपारी काम करीत होते. अचानक पावसाला प्रारंभ झाल्याने आश्रय घेतलेल्या झाडावर वीज कोसळून गजानन व संतोष जागीच ठार झाले. जखमी मारोती व बाबारावला सवनाच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच काळीटेंभी येथे रेखा शिंदे आणि सुमन वानखेडे या एका शेतात काम करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात रेखा जागीच ठार झाली. उमरखेड तालुक्यातील धनज शिवारातील शेतात वीज कोसळून वत्सलाबाई शेळके गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उमरखेडच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर पुसद तालुक्यातील माळआसोली येथे किशोर राठोड आणि माणिकडोह येथे तुकाराम पवार वीज कोसळून ठार झाले. हे दोघेही आपल्या शेतात आज दुपारी काम करीत होते. विजेमुळे दोन दिवसात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता दहा झाली आहे.वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात शेतात काम करीत असलेली सुनीता देवराव गायकवाड रा.दहेगाव, ता. राळेगाव, जि.यवतमाळ ही महिला ठार झाली. ती दशरथ ठाकरे यांच्या शेतात निंदणाचे काम करीत होती. दरम्यान दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. यावेळी वीज पडली. घटनेची माहिती बाबाराव सायंकार यांनी हिंगणघाट पोलिसांनी दिली.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चार्ली शेतशिवारात गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अचानक वीज कोसळली. ही वीज शेतात काम करीत असलेल्या सरस्वती खवसे (६०), कवडू खवसे (४२) व माधुरी खवसे (३७) यांच्या अंगावर पडली. त्यात सरस्वती खवसे या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर कवडू व माधुरी गंभीर जखमी झालेत. या दोघांवर राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचवेळी तालुक्यातील जैतापूर शेतशिवारातही वीज पडूच शेतात काम करीत असलेली वंदना तोडासे (३८) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील नागरी (रेल्वे) येथे मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शेतात वीज पडून विलास भाऊराव बुरेले (३२) या युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी रंजना बुरेले (२६) ही गंभीर जखमी झाली. तसेच बाजुला असलेला एक बैल जागीच ठार झाला. सावली तालुक्यातील डोनाळा शेतशिवारात मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास वीज कोसळली. या दुर्घटनेत भास्कर शेंडे यांची एक गाय, पुरूषोत्तम बोजलवार यांची एक गाय, किशोर सोनटक्के यांचा गोऱ्हा व खुशाल भोयर यांची एक गाय अशी चार जनावरे अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडली. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील उकळी व हिवरा साबळे शिवारात गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अनेक गावात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. उकळी शिवारात मोहन बोरे यांच्या शेतात पावसापासून संरक्षण होण्यासाठी महिला निंबाच्या झाडाखाली गेल्या. मात्र झाडावर वीज पडल्याने उकळी येथील सोनु शिवाजी अवदगे (२०) या महिलेचा मृत्यू झाला. तसेच सुरेखा रामप्रसाद खोडवे ही गंभीर जखमी झाली आहे. तसेच याच शिवारात स्वत:च्या शेतात काम करीत असताना वीज पडून सुमित्रा अर्जुन बोरे (५५) ही गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तालुक्यातील हिवरा साबळे येथेही वीज पडून ज्ञानेश्वर सखाराम गायकवाड (२५), प्रदुप सुभाष वाघ (२५) व सुवर्णा ज्ञानेश्वर गायवाकड हे तिघे गंभीर जखमी झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विदर्भात वीज कोसळून १५ ठार
By admin | Updated: August 22, 2014 01:32 IST