ठाणे : दिवा हे शहर ठाणे महापालिकेत असूनही तेथील तीव्र पाणीटंचाईकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून त्यासाठी त्यांनी एमआयडीसीला दोषी ठरवले आहे. या टंचाईविरोधात प्रा. कृष्णमूर्ती शिवा अय्यर यांनी नुकतेच १२ तास पाण्याविना राहून उपोषण केले. पण, त्याची दखल पालिकेने घेतलीच नाही. त्यामुळे दिव्यातील जनतेला पाणी मिळो किंवा न मिळो, त्याच्याशी ठाणे महापालिकेला देणेघेणे नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिव्यात पाणीटंचाई असल्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने महिलांना पाण्यासाठी प्रसंगी मुंब्रा, ठाकुर्लीपर्यंत धाव घ्यावी लागते. ‘कॉमन मॅन’साठी लढा देणारे प्रा. अय्यर डोंबिवलीत सागावमध्ये राहतात. हे गाव महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांपैकी आहे. या गावातही पाणीटंचाई आहे. रविकिरण सोसायटीत पाणी येत नाही. तेथे पोहोच रस्ता नाही. यासाठी अय्यर यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यांनी उपोषणही केले होते. तसेच डोंबिवली ते मंत्रालय पदयात्रा केली. विमानतळाच्या विरोधासाठी डोंबिवली ते दिल्ली सायकलने प्रवास केला. अय्यर हे दिव्यातील पश्चिम भागात साऊथ इंडियन शाळा चालवतात. या शाळेत किमान एक हजार ५०० विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. या शाळेतही पाणी येत नाही. दिव्यातील पश्चिम भागाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्याविरोधात अय्यर यांनी महावीर जयंतीला अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत १२ तास पाण्याविना काढले. त्यांच्या सोबतीला दोन विद्यार्थीही होते. शाळेत पिण्यासाठी पाणी येत नाही. या परिसरातील महिला पाण्यासाठी मुंब्रा व ठाकुर्ली परिसरात धाव घेत आहेत. इतके भयाण चित्र दिवा परिसरात आहे. दिवा हे ठाण्याचे उपनगर आहे. पण, ठाणे महापालिका या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. १२ तास पाण्याविना आंदोलन करून अय्यर यांनी महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी त्याला थंड प्रतिसाद देत केवळ निवेदन स्वीकारले. मात्र, पाणी कधी येईल, काय केले जाईल, याविषयी आश्वासन दिले नाही. (प्रतिनिधी)
दिव्यात पाण्याविना १२ तास!
By admin | Updated: April 28, 2016 03:46 IST