पुणे : अकरावी प्रवेशाच्या दोन-तीन फेऱ्या झाल्यानंतर संस्थाचालक ‘आॅनलाईन’ला मूठमाती देत अनेक प्रवेश कॉलेज स्तरावर ‘आॅफलाईन’पद्धतीनेच करतात. मात्र आता संस्थाचालक कोट्यासह सर्वच प्रवेश आॅनलाईन करण्यास शिक्षण संचालकांनी मंगळवारी तत्वत: मान्यता दिली.राज्यात अकरावीचे प्रवेश आता केंद्रीय पद्धतीने करण्यात येतात. पाच वर्षांपासून मुंबईत तर २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून पुण्यात हे प्रवेश आॅनलाईन पद्धतीने सुरु झाले. मात्र आॅनलाईन प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर अनेक ठिकाणी कॉलेजस्तरावरच प्रवेश प्रक्रिया पार पडते. गतवर्षी तर शिक्षण उपसंचालकांनीच १५ जुलैनंतर कॉलेज स्तरावर प्रवेश होतील, अशी घोषणा केली होती. परिणामी ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळणार नाहीत अशा अनेक विद्यार्थ्यांनाही आॅनलाईन प्रक्रियेनंतर ठराविक महाविद्यालयांत प्रवेश मिळाल्याचे प्रकार घडले. सिस्कॉम संस्थेला माहिती अधिकारात याबाबतची अनेक उदाहरणे मिळाली आहेत. अल्पसंख्यांक महाविद्यालयांनी आपल्या कोट्यात आपल्या मर्जीप्रमाणे प्रवेश दिल्याचे सिस्कॉमचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षण संचालक सर्जेराव जाधव, सहसंचालक दिनकर पाटील, राजेंद्र बोधणे यांच्यासमवेत संस्थेची मंगळवारी बैठक झाली. पुणे व मुंबईतील सर्व प्रवेश आगामी शैक्षणिक वर्षापासून आॅनलाईनच करण्यात येतील, असे बैठकीत संस्थेला आश्वस्त केले आहे.
११वीचे प्रवेश आॅनलाईन
By admin | Updated: January 28, 2015 04:48 IST