भुसावळ/बऱ्हाणपूर/धुळे : दोन वेगवेगळ्या अपघातांत खान्देशातील ११ जण ठार झाले. मध्य प्रदेशातील अपघातातील मृतांमध्ये भुसावळच्या एकाच कुटुंबातील ७ जण व चालक यांचा समावेश आहे, तर धुळे येथील अपघातात तिघांचा मृत्यू झाला.भुसावळमधील प्रकाश तोलंबे यांचे कुटुंब ओम्कारेश्वर येथे दर्शनासाठी जात असताना रविवारी पहाटे मध्य प्रदेशातील खंडव्याजवळ त्यांची क्रुझर गाडी व ट्रकची धडक झाली. त्यात प्रकाश तोलंबे (६५), त्यांच्या पत्नी कमला (६०), मुलगा नितीन तोलंबे (४०), नितीन यांची पत्नी स्मिता (३५), मुलगी निकिता (१४), विभूषा बिपीन तोलंबे (५), पूजा तोलंबे (३०) व क्रुझरचा चालक विनय झाल्टे (३५, मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला. जखमी बिपीन तोलंबे यांची प्रकृती गंभीर आहे. बिपीन यांची पत्नी विधी, धाकटा भाऊ सचिन, सचिन यांचा मुलगा विराज (३) व विराट (८ महिने), विभान बिपीन तोलंबे (९) किरकोळ जखमी झाले़ अपघात एवढा भीषण होता की क्रुझर गाडीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर गाडीतील प्रवासी दूरवर फेकले गेले़ ट्रकचा चालक फरार झाला आहे.दुसरा अपघात धुळे जिल्ह्यात झाला. शनिवारी रात्री धुळ्यातील इम्तियाज अहमद (३६), नसरीम लतीफ अन्सारी (४५) आणि अब्दुल मोईल मोहम्मद जाकीर (४) मोटारसायकलने मालेगावकडे जात होते. मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका खासगी आराम बसने मोटारसायकलला जोरदार धडक दिली़ (प्रतिनिधी)
दोन अपघातांमध्ये ११ जण ठार
By admin | Updated: October 27, 2014 02:14 IST