मुंबई : विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये रॅगिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वारंवार विद्यापीठांना विविध उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अनेक महाविद्यालयांमध्ये अँटी रॅगिंग सेल नसल्याने आणि याबाबत विद्यार्थ्यांमध्येही जागरूकता नसल्याने मुंबई विद्यापीठात गेल्या चार वर्षांत रॅगिंगच्या १0 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी एकाही तक्रारीमध्ये तथ्य आढळले नाही. संलग्न महाविद्यालयांमध्ये रॅगिंगचे किती प्रकार समोर आले, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती मागवली होती. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, २0११ ते २0१४ या चार वर्षांच्या कालावधीत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये रॅगिंगच्या १0 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी एकाही तक्रारीमध्ये तथ्य आढळले नसल्याने कोणावरही कारवाई झाली नसल्याचे विद्यापीठाने दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
चार वर्षांत रॅगिंगच्या १0 तक्रारी
By admin | Updated: December 1, 2014 02:34 IST