संतोष पाटील - कोल्हापूर -पितृपक्ष पंधरवडा संपताच युती-आघाडी यांच्यात जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या मुंबई-दिल्लीत झाल्या. जिल्ह्यातील कोण उमेदवार कोणत्या पक्षाचा झेंडा घेणार, आघाडी-युती होणार की नाही, कोण कोणाच्या विरोधात असणार, आदी मुद्द्यांवर जिल्ह्यातील सट्टाबाजारात दररोज किमान १० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल होत आहे. निकालापूर्वीच कोणाच्या खांद्यावर कोणाचा झेंडा असणार याचा कट्ट्यापासून कार्पोरेट जगतापर्यंत चर्चेला ऊत आला असताना सट्ट्यामुळे बुकीचालक मात्र मालामाल होत आहेत. क्रिकेट सामन्यासह मंगळावर यान उतरणार की नाही, या मुद्द्यावर दररोज मोबाईलद्वारे खेळल्या जाणाऱ्या सट्ट्याची व मटक्याची कोल्हापुरात पाच कोटींपेक्षा अधिकची उलाढाल आहे. यामध्ये आता दुप्पटीने वाढ झाली आहे. क्रिकेट व इतर खेळांसाठी सट्टा चालविणारी यंत्रणाच आता निवडणुकीच्या काळातही सट्ट्यातून हात धुऊन घेत आहे. यापूर्वी निवडणुकीत मतदानापूर्वी सट्टा बाजार बहरत असे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिंकणार कोण, यापेक्षा आघाडी व युती होणार की नाही. कोण कोणत्या पक्षात असेल, यावरच अधिक सट्टा लावला गेला. पितृपक्ष पंधरवडा होईपर्यंत आघाडी व युती होणार काय व कोण किती जागांवर लढणार, कोल्हापुरात काय स्थिती असेल, यावर सट्टा लावला गेला. आता युती व आघाडी तुटल्यास कोण कोणत्या पक्षात असेल, यावर जोरात सट्टेबाजी सुरू आहे. असा लावला जातो सट्टा... क्रिकेटसाठी खेळल्या जाणाऱ्या सट्ट्यातील यंत्रणाच निवडणुकीतील सट्टेबाजारात सक्रिय आहे. नियमित सट्टा खेळणारा व बुकी यांच्यात एक खास मोबाईल क्रमांक असतो. अचानक उठून कोणासही सट्टेबाजारात प्रवेश मिळत नाही. अवघ्या दहा ते पंधरा सेकंदांच्या संवादात सांकेतिक भाषेत सट्टा लावला जातो. क्रिकेट सामना, मालिका किंवा मोठी मालिका यावेळी संपूर्ण खेळ संपल्यानंतर दररोजची बेरीज-वजाबाकी करून कोणी, कोणाला, किती पैसे द्यायचे, याचा हिशेब केला जातो. याच धर्तीवर निवडणूक काळात खेळला जाणारा सट्ट्याचा हिशेब निकाल लागल्यानंतर पूर्ण केला जातो. आता उमेदवारीवरून सुरू असलेला सट्टा कोण जिंकणार, कोणाची सत्ता येणार, इथपासून कोण मुख्यमंत्री होणार, यावरही खेळला जाणार आहे. क्रिकेटच्या सामन्यासाठी ज्याप्रमाणे प्रत्येक ओव्हर व चेंडूवर सट्टा लावला जातो, त्याप्रमाणेच मतमोजणीदिवशी प्रत्येक फेरीला सट्टा खेळला जातो. सट्टेबाजारातील सर्वच यंत्रणा अंडरग्राउंड असल्याने पोलीस यंत्रणा काहीही करू शकत नाही.निवडणूक काळात पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण असल्याने सट्टेबाजार अधिकच बहरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दहा कोटींचा बहरला सट्टा
By admin | Updated: September 26, 2014 00:24 IST