गत खरीप हंगामात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांमुळे आणि ऐन काढणीच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनला फटका बसला. त्याचबरोबर काही प्रमाणात तुरीवरही परिणाम झाला. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, तुरीची आवकही घटली. आवक कमी झाली आणि मागणी वाढली की दरात वाढ होते, या अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे बाजार समित्यांत तुरीच्या दरात वाढ झाली. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ६ हजार रुपये प्रति क्विंटल भावापेक्षा बाजारपेठेत अधिक भाव मिळू लागला.
शेतक-यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून नाफेडच्या वतीने जिल्ह्यात १६ आधारभूत खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. सदरील केंद्रावर जिल्ह्यातील २ हजार ७०० शेतक-यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. परंतु, खुल्या बाजारपेठेत अधिक दर मिळू लागल्याने शेतक-यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीन आणि तुरीची एक रुपयाचीही खरेदी होऊ शकली नाही.
सर्वसाधारण दर ६ हजार ७८० रुपये...
सध्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक २ हजार ५३७ क्विंटलपर्यंत होत आहे. कमाल भाव ६ हजार ९००, सर्वसाधारण ६ हजार ७८० तर किमान दर ६ हजार ३११ रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा शेतक-यांच्या पदरी क्विंटलमागे ७८० रुपये अधिक पडत आहेत. त्यामुळे शेतक-यांनी केवळ नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणीच केली आहे.
शेतक-यांनी फिरविली पाठ...
दरवर्षी खरेदी केंद्रावर सोयाबीन, तूर, हरभरा विक्रीसाठी रांगा लागत असतात. परंतु, यंदा बाजारपेठेत अधिक दर मिळू लागल्याने एकाही शेतक-याने तूर तसेच सोयाबीन विक्री केली नाही. तूर विक्रीसाठी २७०० शेतक-यांनी नोंदणी केली होती, असे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय.ई. सुमठाणे यांनी सांगितले.