अहमदपूर : सोशल मीडियामुळे जग जवळ आले असून दूरवरील व्यक्तीसोबतचा संपर्क वाढला आहे. पण, जवळचा दुरावत आहे. कमेंटस्, स्टेटस, लाईक्सला महत्त्व दिले जात असल्याने तरुणाई त्यात अडकत आहे. परिणामी, मानसिक आरोग्यावर परिणाम हाेत असल्याने पालकांतून चिंता व्यक्त होत आहे.
मोबाईलमुळे अख्खे विश्व जवळ आले आहे. सेल्फी, स्टंट, व्हिडिओ कॉलिंगसाठी तरुण मुले धोक्याच्या स्थळी जात आहेत. त्याचे व्हिडिओ चित्रण करून ते सोशल मीडियावर अपलोड केल्यास जास्त लाईक मिळतात, अशी भावना निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरील आभासी जीवनाकडे कल वाढला आहे. त्यातूनच काही मुलांमध्ये नकारात्मक, जिद्दीची भावना वाढून सहनशीलता कमी होत आहे.
सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे कमेंट, लाईक्सला महत्त्व दिले जात आहे. इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे, कौतुक, स्तुती करावी. इतरांपेक्षा वेगळे असावे, काहीतरी वेगळे करावे, अशी धडपड तरुणाई करीत आहे. त्यातून कमी लाईक्स, कमेंट मिळाल्या तर निराशा वाढते आणि जास्त लाईक मिळाल्या की, त्याच विश्वात तरुण गुरफटून जात असल्याचे चित्र आहे. यातून स्वमग्न होणे, एकलकोंडेपणा, निराशा असे परिणाम वाढत आहेत.
दररोज दीड जीबी, अख्खीखी तरूणाई बिझी...
सध्या सर्वत्र मोबाईल इंटरनेटचे आकर्षण मुलांमध्ये वाढत आहे. त्यामुळे मुले मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. बहुतांश घरातील संवाद कमी होत आहे. दररोज दीड जीबी, सारा तालुका बिझी अशी अवस्था झाली आहे. माझा मुलगा छान मोबाईल हाताळतो, त्याला मोबाईल मधलं सगळं काही जमतं अशी कौतुकाची थाप पालकवर्ग मारत आहे. मात्र, मुलं जशी त्यात गुरफटत गेली, तेव्हा पालकांना भीती वाटायला लागली. मुलं आता हाताबाहेर जाऊ लागल्याने पालकांना काय करावे ? असा प्रश्न पडला आहे.
मोबाईलचा अतिवापर...
मोबाईलचे मुलांना व्यसन लागत आहे. त्यामुळे मनाची एकाग्रता कमी होते. सतत मोबाईल वापरामुळे डोक्यावर ताण येऊन डोळ्यावर परिणाम होतो. व्यक्तिमत्त्वात हट्टी व जिद्दीपणा वाढतो. वनवे कम्युनिकेशनमुळे लाईक्स, कमेंट या गोष्टी महत्त्वाच्या वाटू लागल्या आहेत. सहनशीलता कमी होत जाते.
- डॉ. जयप्रकाश केंद्रे, वैद्यकीय अधिकारी.
मैदानी खेळ आवश्यक...
मैदानी खेळामुळे चिडचिडेपणा दूर होतो. त्याचबरोबर शरीर मजबूत होते.
शिक्षणाबरोबर खेळसुद्धा आवश्यक आहे. आगामी काळात विविध आजारांना समोरे जावे लागणार की काय, अशी भीती आहे. खेळामुळे शरीर व मानसिक ताण दूर होतो. मुलांना मैदानी खेळ आवश्यक आहे.
- प्रा.दत्ता गलाले, क्रीडा प्रक्षिशक.
एकलपणा वाढला...
मुलांमध्ये एकाकीपणा वाढत आहे. खरंतर मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. परंतु, त्यांना खेळण्यासाठी गावात, शहरांमध्ये पुरेसे मैदान नाहीत. सोसायटी, गल्लीत मुले खेळण्यासाठी येत नाहीत. पालकांसोबत पुरेसा संवाद नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात मुलांत एकाकीपणा वाढत चालला आहे.
- जयश्री पवार, सहशिक्षिका