मुक्तांगणमध्ये ख्रिसमस सण उत्साहात साजरा
लातूर : शहरातील विशाल नगर परिसरातील मुक्तांगण इंग्लिश स्कूल मध्ये ख्रिसमस सण साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत ख्रिसमस ट्री प्रतिकृतीची आकर्षक सजावट करुन रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रमास अश्विनी केंद्रे, प्राचार्या सुमेरा शेख, माधुरी वाघमारे, कमल मुंडे आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती. या ऑनलाईन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
शाहू महाविद्यालयात क्रीडा सप्ताह साजरा
लातूर : राजर्षी शाहू महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करुन क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव गव्हापणे, उपप्राचार्य डॉ. ए.जे.राजू, डॉ.एस.एन.शिंदे प्रा.अनिरुध्द बिराजदार, प्रा.वावरे, प्रा.आठवले, प्रा. भाताडे, प्रा.सोमवंशी, श्रीकांत मंत्री, अमित बियानी आदींसह प्राध्यापक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
लातूर : जिल्ह्यात रबी हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, शेतक-यांना रात्रीचा विजपुरवठा केला जात असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी आहेत. त्यात अनेक ठिकाणी रोहीत्र नादूरुस्त होत आहेत. त्यामूळे महावितरणने दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.
मनपाच्या वतीने स्वच्छता मोहीम
लातूर : शहर महापालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. अंबाजोगाई रोड, गंजगोलाई, रेणापूर नाका, औसा रोड आदी भागात रात्रीच्या वेळी रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे. तसेच विविध वार्डात कचरा संकलनासाठी नियमित घंटागाडी पाठविली जात आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या कामाला वेग आला असल्याचे चित्र आहे.
जेवळी रस्त्याची दूरवस्था, नागरीकांची गैरसोय
लातूर : तालुक्यातील जेवळी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांमधून होत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरीकांमधून होत आहे. या रस्त्यावर वाहनांची रेलचेल असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
शहरातील सिग्नल सुरु करण्याची मागणी
लातूर : शहरातील विविध चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. सायंकाळच्या वेळी गंजगोलाई, पाच नंबर चौक, दयानंद गेट परीसर, रेणापूर नाका, राजीव गांधी चौक आदी भागात वाहतूकीचा खोळंबा होत आहे. याकडे शहर वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागणी होत आहे. पाच नंबर चौकात अवजड वाहनांची रेलचेल असल्याने दुचाकीचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरातील शाळांमध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम
लातूर : कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. नियमांचे पालन करीत शाळा सुरु झाल्या असल्या तरी मास्क, फिजीकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांचे पालन करीत शाळा सुरु आहेत. जे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही, अशांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम राबविला जात आहे. शिक्षण विभागाच्या वतीने शाळांना भेटी देण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सकाळ आणि दुपारच्या सत्रात शहरातील शाळांत ऑनलाईन अभ्यासक्रमाचा उपक्रम राबविला जात आहे.
एसटी मालवाहतूक सेवेला प्रतिसाद
लातूर : कोरोनामुळे एसटी प्रवासी सेवा बंद होती. त्यामुळे महामंडळाच्या वतीने मालवाहतूकीचा पर्याय अवलंबिला जात आहे. अहमदपूर, औसा, निलंगा, लातूर, उदगीर आगाराच्या वतीने मालवाहतूक बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला व्यापारी, उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत असल्याचे चित्र आहे. आगामी काळात मालवाहतूकीच्या ट्रक वाढविण्याचे नियोजन लातूर विभागीय मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.