अमृत योजनेंतर्गत उदगीर शहराला पाणी पुरवठ्यासाठी लिंबोटी प्रकल्पावरून जलवाहिनी टाकण्य़ाचे काम सुरू आहे. त्यासाठी हडोळती येथील मुख्य रस्ता खोदण्यात येत असल्याने आगामी काळात गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, हे जाणून घेऊन गावकऱ्यांनी सदर काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, उदगीर पालिकेचे मुख्याधिकारी भरत राठोड, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, पाणी पुरवठा सभापती मनोज पुदाले, नगरसेवक ॲड. दत्ता पाटील, ताहेर हुसेन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस.व्ही. कायंदे, उदगीर विभागाचे एस.बी. नागरगोजे, नगर पालिकेचे कटके, अभियंता गणेश पाटील यांच्या उपस्थितीत हडोळतीत बैठक झाली. चर्चेत तांत्रिक अडचणींबरोबर रस्त्याच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा उदगीर नगरपालिका व गुत्तेदाराच्या लेखी आश्वासनानंतर सदर रस्ता खोदकाम करण्यास नागरिकांनी अनुमती दिली.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे खोदकाम होत असल्याने हडोळतीकरांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने रस्त्याची पुनर्बांधणी करण्याची सूचना उपविभागीय अधिकारी कुदळे व तहसीलदार कुलकर्णी यांनी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शादुल शेख, प्रदीप नायणे, संग्राम भोगे, माधव पवार, वैजनाथ निजवंते, गणेश काळींग्रे, अजीम मनियार, दत्ता हेंगणे, अजमद पठाण, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ गिरी, तलाठी विठ्ठल घुमनवाड, पोलीस पाटील बालाजी मिरकले आदी उपस्थित होते.