उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते रविवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती सिद्धेश्वर पाटील होते. यावेळी उपसभापती रामराव बिरादार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, लक्ष्मीताई भोसले, पं.स. उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सुभाष धनुरे, संजय पवार, धनाजी जाधव, आडत असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी घोगरे, विजयकुमार निटुरे, मंजुरखाँ पठाण, धनाजी मुळे, अहमद सरवर, भरत चामले आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, पारदर्शक कारभारामुळे संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्याची दखल घेतली जात आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात व नंतर शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत बाजार समिती संचालकांनी काम केल्यामुळे राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्याने आगामी काळात बाजार समितीच्या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून विकासात्मक कार्याला सहकार्य करण्यात येईल.
यावेळी सभापती सिद्धेश्वर पाटील यांनी बाजार समितीकडे १३ कोटींचा निधी उपलब्ध असल्याचे सांगून त्यातून सोमनाथपूर येथे शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी सात कोटींचे गोदाम बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाच रुपयांत जेवण देण्याची योजना व्यापाऱ्यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. आभार संचालक ॲड. पद्माकर उगिले यांनी मानले.