शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून, २७ गावांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे निवडणुका झालेल्या गावात सरपंच निवडीचे वेध लागले असून, अनेक गावातील विजयी गटाचे सदस्य सहलीवर गेले आहेत. ते आता सरपंचपदाच्या निवडी दिवशीच परतणार आहेत. त्यामुळे निवडणुका झालेल्या गावात सरपंच आणि उपसरपंच कोण होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यामध्ये लक्षवेधी ठरलेल्या सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये साकोळ, येरोळ, तळेगाव (दे), कानेगाव, हिप्पळगाव, हालकी, कारेवाडी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुकीनंतर काही गावातील आरक्षण बदलले आहे. त्यामुळे तेथील राजकीय गणित कसे जुळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या गावातील आरक्षण बदलले...
तालुक्यातील अंकाल (स), उमरदरा, कळमगाव, कारेवाडी, चांभरगा, तिपराळ, हिप्पळगाव, तसेच थेरगाव या गावातील निवडणुकीपूर्वीच्या आरक्षणात बदल झाला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या आरक्षणानुसार येथील राजकीय गणित कसे जुळणार याकडे आता विविध गावाचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील १४ गावात कारभारणी...
तालुक्यातील उमरदरा, कांबळगा, जोगाळा, डिगोळ, तळेगाव (दे), तिपराळ,धामणगाव, बोळेगाव (बु) , भिंगोली येरोळ, शेंद, सांगवीघुग्गी, हालकी थेरगाव या १४ गावात महिला कारभारणी राहणार आहेत.
अठरा गावातील निवडी लवकरच...
तालुक्यातील २७ गावातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, त्यापैकी ९ गावातील सरपंच, उपसरपंचाच्या निवडी पहिल्या टप्प्यात पूर्ण झाल्या आहेत, परंतु अद्याप १८ गावातील निवडी राहिल्या आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवसात सर्वच निवडी पूर्ण होणार असल्याचे तहसीलदार अतुल जटाळे यांनी सांगितले.