निलंगा तालुक्यातील केळगाव येथील वनविभागाच्या जंगलात दहा पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या सर्व पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. दिवसभरात वन्य जीवाला पाण्याची गरज भासत असते. मात्र, एवढ्या मोठ्या जंगलामध्ये एकाही पानवठ्यात पाणी नसल्याने या जंगलातून दुसऱ्या जंगलात वन्यजीवांना पाण्याच्या शाेधात भटकंती करावी लागत आहे. जंगलात अन्न, पाणी मिळत नसल्याने जंगलातील हरीण गावकुसाला येत आहेत. शिवारातील शेतात, रस्त्यावर वावरताना दिसून येत आहेत.
पावसाळ्याचे पाणी जंगलातील लहान मोठ्या तळ्यांत, खड्ड्यांमध्ये साठलेले असते. ते पाणी जानेवारी अखेरपर्यंत वन्य प्राणी आाणि पशू-पक्ष्यांच्या उपयाेगात येते. मात्र, जानेवारीनंतर हा जलसाठा संपला की, उन्हाळ्याची चाहूल लागते, पाण्यासाठी या वन्य प्राण्यांची, जिवांची भटकंती सुरु राहते. उन्हाचा पारा दिवसेंदिव वाढत आहे. या महिन्यात वन्यजिवांना पाण्याची गरज आहे. याकडे अद्यापही वनविभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. शासनाचे लाखो रुपये वन्यजीवांसाठी प्राप्त हाेतात. सध्याला जंगलातील दहाही पानवठे काेरडेठाक पडली आहेत. परिणामी, वन्यप्राणी हरीण, रानडुक्कर, लांडगा, माकड, मोर, लांडोर हे जंगल साेडून राठोडा, लंबोटा, झरी, केळगावच्या गावकुसाला येत आहेत. त्यांची पाण्याच्या भटकंती सुरुच आहे. काही हरीण केळगाव ते निलंगा मार्गावर पाण्यासाठी शाेधात भटकंती करताना दिसून येत आहेत. त्यामुळे मोकार कुत्रे त्यावर हल्ला करत आहेत. अद्याप निधी उपलब्ध न झाल्याने जंगलातील पाणवठे कोरडेठाक आहेत, असे निलंगा येथील वनपरिमंडळ अधिकारी एस.आर. बन म्हणाले.