महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात ४०० बसेस नियमित धावत हाेत्या. मात्र, मार्च २०२० पासून काेराेना महामारीने एसटी महामंडळाचे अर्थचक्र पूर्णत: काेलमडले आहे. राज्यातील लाॅकडाऊनने एस. टी. आणि त्यांचे आर्थिक नियाेजन काेलमडले आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करणेही अवघड झाले आहे. केवळ २५ ते ४० टक्क्यांच्या भारमानावर सध्या एसटीचा प्रवास सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून एस.टी.ची चाके जाग्यावरच थांबली आहेत. ६ जूनपासून अनलाॅकची प्रक्रिया लातूर जिल्ह्यात सुरू झाली. टप्प्या-टप्प्याने बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांचा अद्यापही प्रतिसाद मिळत नाही. प्रशासनाने पूर्ण क्षमतेने एस.टी. बसेस सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या लांब पल्ल्यासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर लालपरी धावत आहे.
मालवाहतुकीचा मिळाला आधार...
एस. टी. महामंडळाने आपल्या आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग शाेधले आहेत. काेराेनाच्या काळात सर्वच यंत्रणा काेलमडली असताना, एस़टी़ने मालवाहतुकीवर भर देत काही प्रमाणात उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. या कालावधीत एस़टी़ला मालवाहतुकीचा आधार मिळाला आहे. मात्र, यातूनही महामंडळाची आर्थिक गरज भागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आर्थिक नियाेजनच काेलमडल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत.
वाडी-तांड्यावरील बसफे-या बंदच...
लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातून ग्रामीण भागातील गाव, वाडी-तांड्याच्या मार्गावर माेठ्या प्रमाणावर बससेवा सुरू करण्यात आली हाेती. मात्र, ‘काेराेना’ने सर्वच बसेस सध्या जाग्यावरच थांबल्या आहेत. लातूर विभागातील ४५० बसेसपैकी २०० बसेस आजही बंद आहेत. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण भागातील बसेस बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ग्रामीण भागातील दळणवळण थंडावले...
ज्या गावात रेल्वे अथवा खासगी वाहने पाेहोचली नाहीत, अशा गाव, वाडी-तांड्यावर महामंडळाची एसटी बस पाेहोचली असून, लालपरीला ग्रामीण भागात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, सध्या लालपरीच बंद असल्याने इतर पर्यायी वाहनांचा वापर करावा लागत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दळणवळण थंडावले आहे.
महामंडळाला मालवाहतुकीचा थाेडाफार आधार मिळाला आहे. आता कुरिअर सेवाही देण्याचा विचार महामंडळ करत आहे. कुरिअर सेवा ग्रामीण भागातील गाव, वाडी-तांड्यापर्यंत घेऊन जाण्याचा विचार सुरू आहे. यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू आहेत. परिणामी, एसटीला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.