जळकोट : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, जनतेच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जळकाेट येथील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तर रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी जारी केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
कोराेनाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस काेराेनाबाधितांचा आकडा वाढत आहे. जळकोट येथील आठवडा बाजार दर सोमवारी भरताे. ताे रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी येथील आठवडा बाजाराला प्रारंभ झाला हाेता. दरम्यान, जळकोट तालुक्यातील एका शाळेसह इतर काहींना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला. कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या पाहता, प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी धार्मिक स्थळांसह विविध कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून जारी केलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जळकोट शहरात साेमवारी भरणारा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. जळकाेट तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी याची नाेंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावा-गावातील भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, किराणा, स्टेशनरी विक्रेते, लहान-लहान व्यवसाय करणाऱ्यांचे नुकसान हाेणार आहे.