लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदपूर : दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या वीकेंड लॉकडाऊनला व्यापारी, नागरिकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला आहे. बाजारपेठ बंद-चालूमुळे व्यापारी नाराज तर प्रशासन हतबल असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकही संभ्रमावस्थेत आहेत. शनिवार आणि रविवार आल्यानंतर लॉकडाऊन आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
अहमदपूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, सध्या संपूर्ण तालुक्यात ६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटर व सर्व कोविड रुग्णालये बंद झाली आहेत. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाच्या नियमानुसार दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आस्थापना सुरु ठेवण्याची वेळ असतानाही प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे काही दुकाने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु असल्याचे पाहायला मिळते.
वीकेंड लॉकडाऊनमध्येही शिथिलता आल्याचे दिसून येत आहे. व्यापारी शनिवार व रविवार येताच पोलीस अथवा महसूलचे वाहन केव्हा येते, त्याची प्रतीक्षा करत असतात. पोलिसांचे वाहन आल्यानंतर शटर बंद केले जाते. वाहन गेल्यानंतर पुन्हा दुकाने उघडली जातात. त्यामुळे प्रशासन हतबल तर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दुकानातील कामगारांना बोलवावे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पूर्णवेळ लॉकडाऊन करा आणि त्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे अन्यथा वीकेंड लॉकडाऊन रद्द करा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. नागरिकही दर आठवड्यात संभ्रमावस्थेत असतात. शनिवार आल्यानंतर दुकाने उघडणार का नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
नागरिकांनी स्वत: नियम पाळावेत...
शहर व तालुक्यातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी त्याचे कारण लॉकडाऊन आहे. रहदारीवर नियंत्रण असते. नागरिकांनी स्वतः नियम पाळले पाहिजेत, असे उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांत साशंकता...
दर शनिवारी व रविवारी अनेक व्यापारी आस्थापना उघडतात. पोलीस, महसूल प्रशासनाची फेरी आल्यानंतर ते बंद करतात. त्यानंतर सुरु करतात. त्यामुळे प्रशासन हतबल आहे. व्यापारी बंद-चालूमुळे नाराज आहेत. कुठलाही एक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा लॉकडाऊनमध्ये सूट द्यावी, असे किराणा असोसिएशनचे अध्यक्ष मन्मथ प्रयाग म्हणाले.
कामगारांची अडचण...
शनिवारी व रविवारी ग्राहक मोठ्या प्रमाणात येतात. सध्या आषाढात विवाह असल्यामुळे नागरिकांनाही अडचणीचे होत आहे. वीकेंड लॉकडाऊनमुळे कामगाराला कामावर बोलवावे का नाही, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे संभ्रमावस्था होत असल्याचे शिवाजी सूर्यवंशी यांनी सांगितले.
लॉकडाऊनचे नियम पाळा...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असून, याबाबत पोलिसांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यात कुठलीही सूट देण्यात आलेली नाही, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.