चाकूर तालुक्यातील आटोळा, बोळेगाव, नागेशवाडी, उजळंब, कुंभेवाडी, तिवटघाळ, तळघाळ, तिवघाळ, कडमुळी, लातूररोड, मोहनाळ, बनसावरगाव, भाटसांगवी, आदी सतरा गावांसाठी धामणगाव येथील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या योजनेवर असलेल्या विद्युत मोटारीला वीजपुरवठा सुरू होतो. या याेजनेचे जवळपास ३० लाख रुपयांचे वीज बिल थकीत आहे. त्यामुळे वीज पुरवठा गत महिन्यापूर्वी खंडित करण्यात आला आहे. परिणामी, गत महिनाभरापासून पाणीपुरवठा योजना बंद आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याने, नागरिकांची उन्हात भटकंती सुरू आहे. या योजनेवरील गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तर दुसरीकडे पाणीपुरवठा योजना बंद असल्याने अबला-वृद्धांसह महिलांवर घाेटभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ओढावली आहे. उन्हाचा पारा वाढला असून, पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण भटकंती सुरू आहे. वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, ग्रामपंचायतीकडून वीजे बिलाची वसूली करून बिल भरण्याबाबत जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभाग अकार्यक्षम ठरले आहे, असा आराेप संतप्त नागरिकांतून केला जात आहे. याची झळ मात्र सर्वसामान्य जनतेला सहन करावी लागत आहे.
सतरा गावे पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष रामेश्वर हाक्के यांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पाणीपुरवठा पूर्ववत करावा...
चाकूर तालुक्यातील १७ गावांची तहान भागविणाऱ्या सतरा खेडी पाणीपुरवठा याेजनेचाच महावितरणने वीजपुरवठा ताेडला आहे. परिणामी, गत महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद आहे. यातून जनतेला विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. पाणीपुरवठा नसल्याने पाणीपट्टी वसुली होत नाही. प्रशासनाने हा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी आटाेळा येथील सरपंच रेणुका ताेडकरी यांनी केली आहे.