चाकूर : कोरोना संकटाच्या काळात तरी ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे गरजेचे असतानाही तालुक्यातील बहुतांश गावांचे ग्रामसेवक दुसऱ्या तालुक्याच्या गावाहून ये-जा करीत आहेत. परिणामी, गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. तहसीलदारांनी मुख्यालयी राहण्याच्या लेखी सूचना केल्या असल्या तरी त्यास वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत.
चाकूर पंचायत समितीअंतर्गत ७१ ग्रामपंचायती आहेत. या गावांचा कारभार ५५ ग्रामसेवकांवर आहे. गावातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्याचे काम ग्रामसेवकावर आहे. मात्र, गावपातळीवर काम करणारे ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत. कोरोना संकटाच्या काळातही ग्रामसेवक दररोज अप-डाऊन करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही कार्यक्रम घेण्यास मनाई केली असतानाही तालुक्यातील लिंबाळवाडी येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे गावातील १८१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले. या कार्यक्रमाची माहिती तालुका प्रशासनास ग्रामसेवकांकडून मिळाली असती, तर संसर्ग रोखण्यास मदत झाली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
तालुक्यातील बहुतांश गावात ग्रामसेवक राहत नाहीत. लातूर येथून २० ग्रामसेवक दररोज ये-जा करतात. चाकूरहून १२, नळेगावातून ४, अहमदपूरहून ३, लातूर रोड येथून ३, उदगीरहून २, रेणापूरहून २, शिवणखेड (बु.) व अन्य ठिकाणाहून २, महांडोळ, हणमंत जवळगा, मुळकी, रामवाडी, अजनसोंडा (बु.), खरोळा येथून प्रत्येकी एक, असे ग्रामसेवक दररोज ये-जा करतात.
कोरोनाच्या काळात नागरिकांनी फिरू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले असतानाही ५५ ग्रामसेवक दररोज अप- डाऊन करतात. त्यांचा प्रवास धोकादायक नाही का, असा सवाल नागरिकांतून होत आहे. चाकूर पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याचा संसर्ग वाढला. तो कर्मचारी दररोज लातूर येथून ये-जा करीत होता.
गेल्या वर्षी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते; परंतु तहसीलदारांच्या आदेशाला पंचायत समितीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांच्या अप-डाऊनला ब्रेक लागला नाही.
मुख्यालयी राहणे बंधनकारक...
गावपातळीवर घडणाऱ्या सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर आहे. गटविकास अधिकाऱ्यांना लेखी सूचना केल्या आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. लिंबाळवाडीत १८१ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यासंबंधी कारवाई करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना केल्या जाणार आहेत.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.
अन्यथा कारवाई केली जाईल...
सर्व ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. जे ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत. त्यांचा अहवाल विस्तार अधिकाऱ्यांकडून घेऊन त्यानुसार कारवाई करण्यात येईल.
- वैजनाथ लोखंडे, गटविकास अधिकारी.
घरभाडे वसूल करावे...
तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे सक्तीचे आहे. काही जण मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक करीत आहेत. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच आजपर्यंत घरभाडे वसूल करावे.
-सुधाकरराव लोहारे, सामाजिक कार्यकर्ते.
निलंबनाची कार्यवाही करावी...
सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहिल्यास कोरोनाच्या कालावधीत त्यांचा उपयोग होईल. मुख्यालयी राहत नसलेल्यांना निलंबित करावे. लिंबाळवाडी घटनेतील दोषींवर पोलिसांत गुन्हे दाखल करावेत. मुख्यालयी राहण्यासंदर्भात मनसेने यापूर्वी निवेदने देऊन आंदोलने केली होती. अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहावे, अन्यथा आंदोलन करावे लागेल.
- डॉ. नरसिंह भिकाणे, जिल्हाध्यक्ष, मनसे.