या भागातील फिडर साठी अतिरिक्त फिटर बसविण्यात यावे, वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी त्रस्त ग्रास्थांसह शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा सात गावाच्या लोकांनी महाविरतणच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. सोनवळा, मंगरूळ, डाेंगर कोनाळी, धनगरवाडी, लाळी खु., लाळी बु. या सात गावांना वीज मंडळाच्या अतिरिक्त भाराचा फटका सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा बंद हाेत असल्यामुळे पाणी असून, गावांमध्ये कृत्रिम टंचाईला नागरिकांना समोरे जावे लागत आहे. याबाबत अनेकदा अर्ज, विनंत्या करून महावितरण कंपनीकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे वसुलीचा तगादा सुरुच आहे. तर दुसरीकडे वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये घेतलेला उन्हाळी भुईमूग शेंग, उसाचे पाण्याअभावी नुकसान हाेत आहे. काही ठिकाणी उभे पीक वाळून जात आहे. याबाबत कार्यकारी उपअभियंता शंकर सावळे आणि कनिष्ठ अभियंता भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, तीनही फिटरच्या कर्मचाऱ्यांना बोलून घेऊन सूचना केल्या आहेत, असे ते म्हणाले. उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर अधिक दाब येत असल्याने हा प्रकार घडत आहे. याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
अतिरिक्त वाहिनीची व्यवस्था करु...
सोनवळा फिडरवर दाब वाढला असून, त्यासाठी विशेष अतिरिक्त उच्च दाबाची विद्युत वाहिनी बसवण्यात येईल. वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सावळे यांनी सांगितले.
येत्या एक-दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सरपंच संघटनेचे अध्यक्ष सरपंच माहेताब बेग, महेश पाटील, मनोहर वाकळे, निलेश नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदन पाटील, काजम पटेल, खाजा पटेल, सादत पटेल, उमाकांत कवठाळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, रामेश्वर जाधव यांनी दिला आहे.