सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रामलिंग मुदगड येथेही कोरोना बाधित आढळून येत आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाकडून कोविड लसीकरणावर भर देण्यात येत आहे. रामलिंग मुदगड येथे ४५ वर्षांपुढील जवळपास २ हजार नागरिक आहेत. गावात लसीकरणाची सोय नसल्याने त्यांना कासारशिरसी अथवा मदनसुरी येथे जावे लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ये- जा करण्यासाठी वाहनांची सुविधा नाही. परिणामी, येथील नागरिकांची अडचण होत आहे.
ही समस्या दूर करण्यासाठी रामलिंग मुदगड येथील उपकेंद्रात कोविड लसीकरण सुरु करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकारी व तालुका आरोग्य अधिका-यांकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी व नागरिकांच्या सह्या आहेत.