अहमदपूर : कोरोनाला मात देण्यासाठी नागरिकांचे लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने लसीकरणाला गती मिळत आहे. प्रारंभी १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास परवानगी नव्हती; मात्र २१ जूनपासून या गटाचेही लसीकरण सुरू झाले आहे. तालुक्यात २३ जुलैपर्यंत ५५ हजार ५०० नागरिकांनी लस घेतली असून, त्याचे प्रमाण २६ टक्के आहे.
सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ ते ६० तसेच ६० वयोगटापुढील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. तर कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच एप्रिल महिन्यात १८ ते ४४ गटातील लसीकरणाला परवानगी देण्यात आली होती; मात्र काही दिवसांतच त्याला स्थगिती देण्यात आली. यामुळे १६ जानेवारी ते २३ जुलैपर्यंत तालुक्यात ५५ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण झाले. यामध्ये ४३ हजार ६६७ नागरिकांनी पहिला डोस तर ११ हजार ९०० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. केंद्र शासनाने २१ जूनपासून १८ ते ४४ गटाच्या लसीकरणालाही परवानगी दिली होती. त्यानुसार तालुक्यात २२ जूनपासून या गटाच्या लसीकरणाला सुरुवात
झाली.
लसीकरणात तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग...
मे महिन्यात १८ ते ४४ गटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. तेव्हा ऑनलाइन रजिस्ट्रेशन झालेल्यांनाच लस देण्यात आली होती; मात्र काही दिवसांतच हे लसीकरण बंद पडले. त्यानंतर या गटाच्या लसीकरणाची मागणी जोर धरू लागल्याने पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग नोंदविला असल्याचे चित्र आहे.
गर्भवती महिला लसीकरणापासून दूर...
तालुक्यातील लसीकरणासाठी आकडेवारी ५५ हजारांचा आकडा पार करीत असतानाच व लसीकरणाला ६ महिने उलटून गेले असतानाही तालुक्यातील एकही गर्भवती व स्तनदा यांनी लस घेतली नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर असून, अनेक गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण कॅम्प घेतले जात आहेत.
प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण गरजेचे...
कोरोनाच्या विविध प्रकारच्या विषाणूवर लस परिणामकारक ठरलेली आहे. नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करावे. तसेच ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट, जनरेटर प्लॅन्ट बसविण्याचे काम चालू आहे. येत्या दहा दिवसांत हे काम पूर्ण होईल.
-डॉ. दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक