शिरूर अनंतपाळ : शेतीस ये-जा करण्यासाठी रस्ता नसलेले शेतकरी खरीप हंगामातील पेरणीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी आता गाढवांचा वापर करीत आहेत. त्यामुळे बी- बियाणे, खते बांधावर पोहोच करण्यास मदत होत आहे.
तालुक्यातील काही गावात शेत रस्त्याच्या समस्या वर्षानुवर्षे सुरू आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेताला जाण्यासाठी पावसाळ्यात रस्त्या नसतो. ज्या शेताला पाणंद रस्ता आहे, त्याठिकाणी पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या साहित्याची वाहतूक कशी करायची असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांपुढे निर्माण होतो. डोक्यावर खते, बियाणे घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे तालुक्यातील दैठणा येथील शेतकऱ्यांनी नवी शक्कल शोधून काढली आहे. पेरणीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी दुर्गम भागातील शेतकऱ्यांप्रमाणे गाढवांचा वापर सुरू केला आहे.
एका गोणीला २० रूपये भाडे...
शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे पोहाेच करण्याबाबत गोरख कासराळे म्हणाले, गाढवांच्या पाठीवरून एका गोणीची वाहतूक करण्यासाठी २० रूपये भाडे घेतले जात असून एका खेपेला दीडशे ते दोनशे रुपये मिळतात. शेतीसाठी पाणंद रस्ता असल्यास खरिपाच्या पेरणी दरम्यान चिखलामुळे बैलगाडी अथवा ट्रॅक्टरसारखी वाहने घेऊन जाता येत नाहीत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची पेरणी करण्यासाठी खूप मोठी अडचण होते. त्यामुळे अडचणीच्या काळात ही चांगली सोय होत असल्याचे शेतकरी राजकुमार नमनगे, हरिश्चंद्र बिरादार, योगेश बिरादार यांनी सांगितले.