लातूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लातुरात सलग पाच तास धावण्याचा एक आगळावेगळा उपक्रम युवकांनी सादर केला. स्टेडियम रनच्या नावाने हा उपक्रम महिला दिनाच्या एक दिवस अगोदर रविवारी जिल्हा क्रीडा संकुलात पार पडला. यात युवकांनी महिलांप्रती आदर व्यक्त करीत धाव घेतली.
रन फाॅर लाईफ स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने लातुरात स्टेडियम रनच्या नावाने अनोखा उपक्रम रविवारी पहाटे ५ ते सकाळी १० असा सलग पाच तास घेण्यात आला. यात २५ युवकांनी सहभाग नोंदविला. महिलांप्रती आदर, सन्मान व्यक्त करण्यासाठी व पूर्ण मॅरेथाॅनच्या तयारीसाठी हा उपक्रम घेण्यात आला.
एआरटीओ अशोक जाधव, लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपक शिवपुजे व अमोल बोबडे सातारकर यांनी हिरवी झेंडी दाखवून उपक्रमाला सुरुवात केली. सलग पाच तास धावत युवकांनी आपल्या शारीरिक क्षमतेचे दर्शन घडविले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनिअरिंग ॲण्ड आर्किेटेक्टमार्फत ट्राॅफी देऊन सन्मानित करण्यात आले.
असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत देशपांडे, धर्मवीर भारती, शिवशंकर फिस्के यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी कौटुंबिक सदस्य व बालकांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली.