यंदा शासनाने ३ हजार ८८० रुपयांचा हमीभाव जाहीर केला हाेता. गत वर्षाच्या हमीभावाच्या तुलनेत १७० रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र, यंदा हमी भावाची केंद्रच बंदच होती. सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांची मागणी वाढती असल्याने हंगामत सोयाबीनचे स्थिनर भाव ४ हजाराच्या आसपास होते. तर टप्याटप्याने वाढत गेले. अंतराष्ट्रीय बाजारातील सोया पेंडीला वाढती मागणी. तसेच खाद्यतेलाचे दर वाढत असल्याने सोयाबीनच्या दरात दिवसेंदिव वाढ होत गेली. वायदे बाजारात सोमवारी एकाच दिवसात तब्बल ३०० रुपयांची वाढ झाल्याने प्रत्यक्ष बाजारात त्याचा परिणाम दिसून आला. उदगीरच्या मार्केट यार्डात सोयाबीनला २०१४ नंतर बुधवारी आतापर्यंतचा उच्चांकी ६ हजार ४५० प्रतिक्विंटलला दर मिळाला आहे.
गत तीन महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या मार्केट यार्डात नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. प्रारंभीला परतीच्या पावसाने सोयाबीनचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, शेतमाल काळसर पडला. मात्र, गत एक महीन्यापासून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची आवक वाढली आहे. आवक मोठ्या प्रमाणात होऊनही सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या स्थानिक आणि बाहेरील कारखानदारांकडून मागणी चांगली होती. त्यातच सोयाबीनच्या तेलालाही उठाव असल्याने कारखानदार, साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जोरदार खरेदी केली. बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ हाेत असल्याने सामान्य ग्राहकांत नाराजी आहे. परिणामी, शासनाने आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात होणाऱ्या खाद्य तेलाच्या किंमतीवरील शुल्कात १० टक्के कपात करण्यात आली आहे. परंतु, त्याचा बाजारावर काहीही परीणाम झाला नाही. उलट सोयाबीनचे दर मागील पंधरा दिवसात झपाट्याने वाढतच गेले. आता शेतकऱ्यांकडील शेतीमाल संपत आला आहे. त्यात कारखानदारांकडून मागणी वाढत चालल्याने दरात येणाऱ्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी बोलून दाखवत आहेत.
आगामी काळात दरवाढ हाेणाऱ्या शक्यता...
यंदा देशात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच आयात होणारे पामतेलाचे दरही वाढत चालले आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत पाहता सोयाबीन तेलाचे भाव वाढत आहेत. यंदा भारतातील सोया पेंड अपेक्षेपेक्षा जास्त निर्यात झाली आहे. शेतकऱ्यांकडील माल संपत आला आहे. आता सोयाबीन व्यापाऱ्यांकडे साठा केलेला आहे. ते व्यापारी आणखी दरवाढ होण्याची वाट पहात आहेत. त्यात वायदे बाजारात दर वाढले आहेत. स्थानीक बाजारात मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने येणाऱ्या कांही दिवसांत आणखी दरवाढ होईल. असे उदगीर येथील सागर महाजन म्हणाले.