लातूर : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवासीसंख्या घटली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन असल्याने प्रवाशांची संख्या नगण्य झाली आहे. त्यामुळे महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जिल्ह्याअंतर्गत फेऱ्या बंद ठेवल्या आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांत २५ बसेसच्या केवळ ४२ फेऱ्या झाल्या. ४००० कि.मी. या बसेस धावूनही केवळ दोन लाखांच्या आत उत्पन्न मिळाले आहे.
लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा या पाच आगारांत एकूण ४५० बसेस लाॅकडाऊनपूर्वी धावत होत्या. या बसेसच्या ५५० ते ६०० फेऱ्यांतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत होते; परंतु, नंतर लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर ३०० बसेस धावू लागल्या. दिवसाला ३५ लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र गेल्या शनिवार (दि. ३) पासून लाॅकडाऊन आहे. या लाॅकडाऊनमध्ये एस.टी. प्रवासाची मुभा आहे. परंतु, प्रवासीच नाहीत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत फेऱ्याही बंद झाल्या आहेत. विद्यार्थी बसही बंद झाली आहे.
जिल्ह्यात लाॅकडाऊनपूर्वी ४५० बसेसच्या ६०० फेऱ्या होत्या. त्यातून ७० लाखांच्या पुढे दिवसाला उत्पन्न मिळत होते. मात्र २०२० मध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्याने बसेस बंद होत्या. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर एस.टी. धावू लागली. परंतु, प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. प्रतिसाद वाढताच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन आहे. परिणामी, एस.टी.ला लाखोंचा तोटा सहन करावा लागत आहे.
लातूर आगाराच्या शनिवारी (दि. १०) चार फेऱ्या झाल्या. रविवारी चार फेऱ्या पूर्ण झाल्या आणि पुणे येथे एक बस सोडण्यात आली होती. यातून लातूर आगाराला केवळ १३ हजार रुपये मिळाले.
गेल्या दोन दिवसांमध्ये डिझेलपुरतेही पैसे एस.टी.ला मिळू शकले नाहीत. अनलाॅक झाल्यानंतर एस.टी.ची परिस्थिती सुधारत होती. कोरोनावर मात करीत अधिकारी, कर्मचारी कामाला लागले होते. मात्र मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत गेला आणि कडक निर्बंध लागू झाले. त्यामुळे प्रवासीसंख्या घटली. परिणामी, एस.टी.ला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरापासून एस.टी. तोट्यात आहे.
जिल्ह्यात लाॅकडाऊनपूर्वी ४५० बसेसच्या ६०० फेऱ्या होत्या. त्यातून दिवसाला ७० लाखांच्या पुढे उत्पन्न मिळत होते. मात्र २०२० मध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्याने बसेस बंद होत्या. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर एस.टी. धावू लागली. परंतु, प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. प्रतिसाद वाढताच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन आहे. परिणामी, एस.टी.ला लाखोंचा तोटा सहन करावा लागत आहे.