महाजन जगदेव पवळे (१३, रा. चिकली, ता. कंधार, जि. नांदेड) व आदित्य आनंदराव मुर्के (१३, रा. गुजरी, ता. बिलोली, जि. नांदेड) अशी मयत बालकांची नावे आहेत.
पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही. बोईनवाड यांनी सांगितले, नांदेड जिल्ह्यातील जगदेव पवळे व आनंदराव मुर्के हे दोघे सालगडी म्हणून जळकोट येथील शेतकऱ्याच्या शेतात काम करीत आहेत. हे दोघेही आपल्या कुटुंबासह शेतात राहतात. रविवारी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास हे सालगडी शेतात फवारणीच्या कामात व्यस्त होते. तेव्हा महाजन पवळे व आदित्य मुर्के ही दोन्ही मुले शेततळ्यातील पाणी आणण्यासाठी हंडा घेऊन गेली होती. हंडा भरुन घेत असताना अचानकपणे दोन्ही बालकांचा पाय घसरुन तोल गेला. त्यामुळे दोघेही पाण्यात पडून बुडून मृत्युमुखी पडले.
दरम्यान, कुटुंबातील दोन्ही बालके नसल्याचे पाहून नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी शेततळ्याकडे जाऊन पाहणी केली असता तिथे बालकांचे मृतदेह आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच पोउपनि. व्ही.व्ही. बोईनवाड, प्रकाश चिमनदरे, राहुल वडारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची जळकोट पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
एकुलता एक मुलगा गेला...
आनंदराव मुर्के यांना एक मुलगी आणि आदित्य अशी दोन लेकरे होती. मुलाचा शेततळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने आई- वडील आक्रोश करीत धाय मोकलून रडत होते. त्यामुळे तिथे थांबलेल्यांचे हृदय हेलावत होते.