याबाबत रावणकोळा येथील सरपंच ज्योत्स्ना पाटील, उपसरपंच सुनील राठोड, व्यापारी संघटनेचे रामदास पाटील, नबी शेख यांच्या नेतृत्वाखाली देवनगरतांडा व राठोडतांडा येथील बंजारा समाजाच्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांना निवेदन दिले आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. या रस्त्यावरुन साधी मोटारसायकलही चालवता येत नाही. बैलगाडीवरही जाता येत नाही. रात्री-अपरात्री आजारी असलेल्या व्यक्तीला रुग्णालयात न्यायचे म्हणजे खाटेचा वापर करावा लागताे. वेळेवर उपचार न मिळाल्याने खडतर रस्त्याने अनेकांना आपला जीव वाटेतच गमवावा लागला आहे. याकडे स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
तालुक्यातील २० तांड्यांच्या रस्त्याचे सर्वेक्षण करा...
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या गावाला रस्ता करावा, महामंडळाची बस सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. देवनगरतांडा, रावणकोळातांडा, राठोडवाडी तांडा, बालाजीतांडा या तांड्यावरील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शासनाने तातडीने जळकोट तालुक्यातील २० पेक्षा अधिक तांड्याचा सर्व्हे करून, या रस्त्याला मंजुरी द्यावी. या रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी सरपंच ज्योत्सना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष सत्यवान दळवी-पाटील, रामदास पाटील, बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब पाटील-दळवी, बालाजी दळवी, सत्यवान पांडे, सुनील राठोड यांनी केली आहे.