अहमदपूर : तालुक्यातील १७२ पैकी ५२ जिल्हा परिषद शाळांतील स्वच्छतागृह मोडकळीस आले आहेत. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना लघुशंकेसाठी उघड्यावर जावे लागत आहे. दुरुस्तीसाठी निधीची मागणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानअंतर्गत प्रत्येक घरास स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले आहे. मात्र, तालुक्यातील ५२ शाळांतील स्वच्छतागृह मोडकळीस आले आहेत. विशेष म्हणजे, काही शाळांत मुला व मुलींसाठी एकच स्वच्छतागृह असल्याचे मुख्याध्यापकांनी केलेल्या सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल नुकताच शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यातील ५२ शाळांपैकी २० ठिकाणी स्वच्छतागृह मोडकळीस आले आहेत, तर ३२ ठिकाणचे स्वच्छतागृह सध्या वापरात नाहीत. त्यामुळे ३२ ठिकाणच्या कामाचे प्रस्ताव समग्र शिक्षण अभियानअंतर्गत मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यासाठी ६४ लाखांचा निधी लागणार असून हा निधी मंजूर होताच मुख्याध्यापक व शालेय समितीच्या देखरेखीखाली सदर शौचालयाचे काम होणार आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १७२ शाळा असून त्यात १२ हजार ८७२ विद्यार्थी आहेत. मुलींची संख्या ६ हजार ४२६ तर मुलांची संख्या ६ हजार ४४५ अशी आहे. मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. त्यामुळे स्वच्छतागृहाअभावी सर्वाधिक अडचण मुलीची होत आहे. याबाबत त्वरित दुरुस्तीचा निधी उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन काही ठिकाणच्या सरपंचांनी दिले आहे.
३२ ठिकाणी नवीन स्वच्छतागृहाची मागणी...
१७२ पैकी ३२ शाळांतील शौचालय अस्तित्वात असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे ते वापरात नाहीत. त्यासाठी समग्र शिक्षण अभियानअंतर्गत ६४ लाखांची मागणी केली असून सध्या निधीची अडचण असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी नानासाहेब बिडवे यांनी सांगितले.
किरकोळ दुरुस्तीसाठीही निधी नाही...
३० स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून त्याच्या किरकोळ दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे कुठलाही निधी उपलब्ध नाही. त्यामुळे त्याचा वापर करता येत नाही. वेळेवर दुरुस्ती न केल्यास ते कायमस्वरूपी बंद पडू शकतात. त्यामुळे निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त...
जिल्हा परिषदेच्या १७२ शाळांत ६ हजार ४४५ मुली असून ६ हजार ४२६ मुले आहेत. मुलींची संख्या मुलांपेक्षा २५ ने जास्त आहे. स्वच्छतागृह मुलींची अडचण होत आहे.