गत दोन आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा घसरला हाेता. मात्र, पुन्हा ढगाळ वातावरण कमी झाल्यानंतर तापमानाचा पारा पुन्हा ४० अंशाच्या घरात गेला आहे. आता गत चार दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात वाढ हाेत आहे. सकाळी दहानंतर रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. सायंकाळी ५ पर्यंत वातावरणातील उकाडा कायम राहत आहे. सायंकाळी सहानंतरच नागरिक घराबाहेर पडणे पसंत करत आहेत. सध्याला वाढत्या उन्हाच्या चटक्याने शेतकरीही आपली शेतीतील उन्हाळी कामेही सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात करत आहेत. सध्याला शेत-शिवारात माेठ्या प्रमाणावर शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. रविवार, २८ मार्च राेजी औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर या परिसरातील तपामान ४० अंशावर पाेहाेचला असल्याची नाेंद आहे. गत आठवड्यात हेच तापमान ३८ अंशाच्या घरात हाेते. गत चार दिवसांपासून वाढणाऱ्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून, दुपारी रस्ते निर्मनुष्य दिसून येत आहेत. नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या सावलीचा आधार घेत आहेत. शुक्रवारी कमाल तापमान ३८ अंश, शनिवारी कमाल तापमान ३८.५ तर रविवारी कमाल तापमान ४० अंशावर गेल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. तर किमान तापमानही २४.५ पोहोचल्याने रात्री उकाडा जाणवत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घसरत आहे. बाष्पीभवनाचा दर सात मिलिमीटर इतका वर पोहोचल्याने पाणी पातळीत घट होत आहे.
बंधाऱ्यातील जलसाठा घसरला...
औराद शहाजानी जलसिंचन शाखेंतर्गत असलेल्या तेरणा नदीपात्रावर एकूण सात बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये औराद शहाजानी, वांजरखेडा, तगरखेडा, गुंजरगा, साेनखेड, मदनसुरी, लिंबाळा, किल्लारी -१ आणि किल्लारी -२ यांचा समावेश आहे. सध्याला वाढत्या तापमानामुळे या सातही बंधाऱ्यातील जलसाठ्यावर माेठा परिणाम झाला आहे. दिवसेंदिवस धरणातील जलसाठ्यात घट हाेत असून, जूनअखेरपर्यंत हा जलसाठा कमालीचा घसरणार असल्याचे औराद शहाजानी येथील जलसिंचन शाखा अधिकारी एस.आर. मुळे म्हणाले.
मार्चमध्येच तीन बंधारे पडले काेरडे...
औराद शहाजानी येथील तेरणा नदीपात्रावर एकूण सात बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. गत आठवड्यात ढगाळ वातावरण हाेते. आता या वातावरणात बदल झाल्याने, पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्याला वाढणाऱ्या तापमानामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने घसरत आहे. सात बंधाऱ्यांपैकी वांजरखेडा, साेनखेड आणि लिंबाळा ही बंधारे काेरडी पडली आहेत. तर चार बंधाऱ्यांमध्ये सरासरी जलसाठा ४० ते ५० टक्क्यांच्या घरात आला आहे.
तापमानात आणखी हाेणार वाढ...
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गत चार दिवसांपासून तापमानाचा पार वाढला आहे. सध्याचे तापमान ४० अंशावर गेले आहे. परिणामी, गत आडवड्यात हाच पारा ३८ अंशावर हाेता. आता वातावरणात बदल झाला असून, तापमान वाढल्याने उकाडाही वाढला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढत हाेत असल्याने, रस्त्यावरही शुकशुकाट दिसून येत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात हाच तापमानाचा पारा ४५ अंशावर राहणार असल्याचे हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाइकवाडे यांनी सांगितले.