वाहनाची दुचाकीला धडक; एक जण गंभीर
लातूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून एमआयटी कॉलेजकडे जात असताना नवीन रेणापूर नाका येथे नंबर नसलेल्या चारचाकी मालवाहतूक गाडीने दुचाकीस धडक दिल्याची घटना शनिवारी घडली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी राहुल श्रीरंग कांबळे (३२, रा. ड्रायव्हर कॉलनी, लातूर) हे व त्यांचे भावजी एमएच २४ बीएफ ००९८ या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून एमआयटी कॉलेजकडे जात होते. दरम्यान, नवीन रेणापूर नाका येथे नंबर नसलेल्या एका चारचाकी मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने आपल्या ताब्यातील वाहन हयगय व निष्काळजीपणे चालवून मोटारसायकलला जोराची धडक दिली. यामध्ये फिर्यादी व त्यांचे भावजी जखमी झाले आहेत. या अपघातात मोटारसायकलचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, राहुल कांबळे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात नंबर नसलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. देशमुख करीत आहेत.
हिसका मारून हातातील मोबाईल लंपास
लातूर : राहत्या घरून रिडींग रुमकडे जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने हातातील मोबाईल हिसका मारून चोरून नेल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी फिर्यादी हेमंत सदाशिव भोसले (रा. पंढरपूर, ह.मु. कोकाटे नगर,लातूर) यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी हेमंत भोसले आपल्या राहत्या घरून रिडींग रुमकडे जात होता. दरम्यान, विनानंबरच्या एका दुचाकीवर आलेल्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या हातातील मोबाईल हिसका मारून चोरून नेला. या घटनेत १९ हजार रुपयांचा मोबाईल लंपास केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पुढील तपास सपोसई. काझी करीत आहेत.
संगनमत करून एकास मारहाण
लातूर : तू माझे अंगावर सुपारी खाऊन का थुंकलास असे विचारले असता संगनमत करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना हिप्पळगाव पाटी येथे घडली. या प्रकरणी संतोष प्रकाश महापुरे (रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर) यांच्या तक्रारीवरून नसरोद्दीन अब्दुलसाब शेख व सोबत असलेले दोघे (सर्व रा. हडोळती, ता. अहमदपूर) यांच्याविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात एचएमएनसी नोंद करण्यात आली आहे.