अहमदपूर : ६० वर्षांपुढील नागरिकांना तसेच ४५ ते ५९ वयोगटांतील दुर्धर आजारी व्यक्तींना १ मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात ८ मार्चपर्यंत ७५१ ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला ओढा वाढला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या सूचना करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दरम्यान, १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीस आरोग्य कर्मचारी, पोलीस, होमगार्ड, तलाठी, महसूल, ग्रामसेवक, शिक्षक, नगरपालिका, खासगी व सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका, औषधी निर्माता, लॅब टेक्निशन, सफाई कामगार, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविकांना लस देण्यास सुरुवात झाली. दरम्यान, कोरोना लसीकरणाची गती वाढवून १ मार्चपासून ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वर्ष वयोगटांतील दुर्धर आजार असलेल्यांना लसीकरण करण्यात येत आहे.
कोरोना लसीकरणाला गती यावी, म्हणून आरोग्य विभागाकडून जनजागृती करून लसीकरण करण्यात येत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयास तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात येत आहे. गावातच लसीकरण होऊ लागल्याने ज्येष्ठांचा ओढा वाढला आहे.
२८ दिवसांनंतर दुसरा डोस...
ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० वर्षांपुढील नागरिक, तसेच ४५ ते ५९ वर्ष वयोगटांतील आजार असलेल्यांना मोफत लस देण्यात येत आहे. नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी. ही लस अत्यंत सुरक्षित आहे. ८ मार्चपर्यंत ७५१ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली. ज्या नागरिकांनी लस घेतली आहे, त्यांना दुसरा डोस २८ दिवसांनंतर घेता येईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिरादार यांनी सांगितले.