केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास सन २०२४ पर्यंत नळ कनेक्शन देऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. या मिशनअंतर्गत औराद शहाजानीच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाच्या तांत्रिक समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. राज्याच्या जलजीवन मिशन अभियानचे संचालक आर. विमला यांच्या सूचनेनुसार ही माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी जिल्ह्याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची टीम गुरूवारी औराद येथे आली होती. यामध्ये उपकार्यकारी अभियंता नाना जोशी, उपविभागीय अभियंता बी.एम. शिंदे व शाखा अभियंता के.के. खरोसेकर यांचा समावेश होता.
औराद शहाजानीची पाणीपुरवठा योजना १७ कोटी ५७ लाखांची असून सन २०३८ पर्यंतची गावची लोकसंख्या गृहित धरून आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लीटर शुध्द पाणी मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला मासिक शंभर रूपये द्यावे लागणार आहेत. यासाठी १६ लाख ७८ हजार लिटर क्षमतेची एक पाण्याची टाकी उभारली जाणार आहे. पाणी फिल्टरची यंत्रणाही असणार आहे. गावात एकूण ३ हजार ६०० नळ कनेक्शन गृहित धरून ही योजना तयार करण्यात आली आहे असे सांगून योजनेच्या अंदाजपत्रकाची माहिती शाखा अभियंता के.के. खरोसेकर यांनी दिली.
ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा...
ही पाणीपुरवठा योजना २०२३ पर्यंत कार्यान्वित होईल. त्यासाठी आवश्यक ती पूर्तता व पाठपुरावा औराद शहाजानी ग्रामपंचायतीकडून केला जाईल, असे उपसरपंच महेश भंडारे यांनी सांगितले. दरम्यान, या पथकाने पाणीपुरवठ्याच्या जलस्रोतांची पाहणीही केली. याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार उपसरपंच महेश भंडारे, लक्ष्मण कारभारी व बालाजी भंडारे यांनी केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवि गायकवाड, राजू रेड्डी, कन्हैया पाटील, महेंद्र कांबळे, ग्रामसेवक धनाजी धनासुरे, प्रा. प्रदीप पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.