लातूर : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, सह व्याधी असलेले नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. आतापर्यंत प्रस्तुत वर्गवारीत ७५ हजार १७० जणांनी पहिला डोस घेतला आहे.
दरम्यान, १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वच नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, सध्या जिल्हा मुख्यालयाकडे १२ हजार कोरोना लसीचे डोस उपलब्ध आहेत. शिवाय, केंद्रस्तरावर ही लस उपलब्ध आहे. सध्या ७७ लसीकरण केंद्र असून, १ एप्रिलपासून त्यात वाढ केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालय असे ७७ केंद्र आहेत. आता ग्रामीण भागात उपकेंद्रावरही लस देण्याचे नियोजन केले जाणार आहे.
४५ वर्षांपुढील पाच लाख नागरिकांना करावे लागणार लसीकरण
जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाखांच्या घरात आहे. यातील २० टक्के नागरिक ४५ वर्षांपुढील वयोगटांतील येतात. त्यानुसार साडेपाच लाख लोकसंख्या या वयोगटात ग्राह्य धरून आरोग्य विभागाने त्यांना लस देण्याचे नियोजन केले आहे. ७७ केंद्रांवर सध्या लस देणे सुरू असून, त्यात वाढ केली जाणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून केंद्र वाढीसाठी नियोजन करण्यात आले आहे.
सध्या मागणी किती, साठा मिळतो किती?
७७ केंद्रांवर दररोज प्रति केंद्रावर शंभर जणांना लस देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार लसीकरण सुरू आहे. सर्व केंद्रांना या नियमानुसार लस पुरवठा करण्यात आला असून, प्रत्येक केंद्रावर स्टाॅक उपलब्ध करण्यात आला आहे. जिल्हास्तरावर १२ हजार डोसेस उपलब्ध आहेत. १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाणार असल्याने मागणीमध्ये वाढ करण्यात आली आहे.