निटूर : ७/१२ वर दोन्ही भावंडांच्या नावे एकूण ७ एकर जमीन असली तरी ती माळरान असल्याने तिथे कुठलेही पीक घेता येत नव्हते. त्यामुळे ती पडीकच होती. दरम्यान, या भावंडांनी ती कसण्यासाठी प्रयत्न सुरू केले. माळरानावर माती टाकली तसेच बोअरही घेतला. त्यास पाणी लागल्याने त्यांनी उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले आहे. सध्या हे पीक बहरले आहे.
निलंगा तालुक्यातील निटूर येथील शेतकरी ज्ञानोबा ढोबळे यांच्या नावावर ४ एकर, तर त्यांचे चुलत भाऊ शिवाजी ढोबळे यांच्या नावावर तीन एकर अशी वडिलोपार्जित शेती आहे. त्याची ७/१२ वर ही नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात ही शेती माळरान असल्याने तिथे काहीही पिकत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह अन्य कामांवर अवलंबून आहे. या दोन्ही चुलत भावंडांचे शिक्षणही कमीच आहे. मात्र, त्यांनी वडिलोपार्जित शेती फुलविण्याचा निर्धार केला.
या दोघांनी सुरुवातीस नजीकच्या तलावातून काळी माती आणून ती माळरानावर टाकली. त्यामुळे माळरान सुपीक होण्यास मदत झाली. त्यानंतर त्यांनी जमिनीची मशागत करून पाण्यासाठी बोअर घेतला. सुदैवाने त्यास पाणीही लागले. त्याच्या आधारावर त्यांनी उन्हाळी भुईमूग आणि उडदाची पेरणी केली. सध्या ही दोन्ही पिके जोमात आली असून बहरली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातही माळरान हिरवागार दिसत आहे. यातून चांगले उत्पादन मिळण्याची या शेतकऱ्यांना आशा आहे. ते वर्षभरातून तीन पिके घेतात. भाजीपाल्याचेही उत्पादन घेतात. आंबा, चिंच, कडीपत्ता, लिंबूच्या झाडांचीही लागवड केली आहे.
प्रयत्न करणे आवश्यक...
शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो; परंतु नियोजनपूर्वक शेती केल्यास ती निश्चित फायदेशीर ठरते. एखाद्या वर्षी अपेक्षित उत्पादन मिळत नाही; परंतु त्याची कसर दुसऱ्या वर्षी निघू शकते. त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करावी, असे शेतकरी ज्ञानोबा ढोबळे, शिवाजी ढोबळे यांनी सांगितले.