निलंगा : नगर परिषद कार्यालयात सेवारत असलेल्या एका सफाई कामगाराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे नगर परिषदेच्या आवारात घडली. बाबुराव नामदेव गायकवाड (वय ५७) असे मयत सफाई कामगाराचे नाव आहे. पाेलिसांनी सांगितले, सफाई कामगार बाबुराव गायकवाड हे निलंगा येथील नगर परिषदेत गेल्या ३२ वर्षांपासून कार्यरत आहेत. निलंगा नगर परिषदेत ३६ सफाई कामगार हे कायमस्वरुपी आहेत तर ७० कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. ७० सफाई कामगारांचे नियंत्रण एका खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. निलंगा नगर परिषदेने सर्व बिले एजन्सीला दिली आहेत. मात्र, खासगी एजन्सीकडून वेळेत पगार अदा करण्यात आला नाही. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या बाबुराव गायकवाड यांनी नगर परिषदेच्या आवारात असलेल्या झाडाला बुधवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयताचा मुलगा दत्ता बाबुराव गायकवाड यांनी निलंगा पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नातेवाईकांचा संतप्त पवित्रा
बाबुराव गायकवाड यांच्या मृतदेहाचे विच्छेदन निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करुन अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. यामुळे उपजिल्हा रुग्णालय परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण हाेते. दरम्यान, निलंगा पाेलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सावंत, गजानन क्षीरसागर यांनी दाेन दिवसात चाैकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी पाच वाजता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.