अवैध दारू विक्रीवर कारवाईची मागणी
कासार बालकुंदा : निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कासार बालकुंदा गावामध्ये अवैद्य गावठी दारू विकण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे दोन जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना, महावितरण ऑफिस असून, याच परिसरात अवैध दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे मद्यपींचा त्रास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. प्रशासनाने यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
गणेश मंदिरात अभिषेक, महाप्रसादाचे वाटप
अहमदपूर : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या वतीने अष्टविनायक श्री गणेश मंदिरात अभिषेक करण्यात आला, तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गेल्या अकरा वर्षांपासून महिन्याच्या प्रत्येक चतुर्थीला शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कल्पनाताई रेड्डी यांच्या अभिषेक, तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. यावेळी शहरप्रमुख भारत सांगवीकर, नगरसेवक संदीप चौधरी, लक्ष्मण अलगुले, प्रवीण डांगे, शिवकुमार बेद्रे, अजित सांगवीकर यांची उपस्थिती होती.
जिल्हा सहसचिवपदी शिवानंद भुसारे यांची निवड
येरोळ : येथील शिवानंद भुसारे यांची जिल्हा लिंगायत महासंघाच्या सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.प्रभाकर चोंचडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष मैनोद्दीन मुजेवार, युवानेते रविनाथ महाराज तांबोळकर, रवि पाटील, राम सुमठाणे, अभियंता कैलास चोंचडे, अनिल घाठणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा.सुरेश गर्जे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
उदगीर : येथील सेवानिवृत्त प्रा.सुरेश गर्जे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन रविवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक मारोतीराव वझरकर होते. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांच्या हस्ते गर्जे यांच्या अमृतचिंतन या ग्रंथाचे तर कृष्णं वंदे जगद्गुरू या ग्रंथाचे प्राचार्य डॉ.बी.टी. लहाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रणजीत घुमे, प्रा.डॉ.एकनाथ भिंगोले, धनंजय गुडसूरकर, प्राचार्य डॉ.लहाने यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन रणजीत घुमे यांनी तर प्रा.डॉ.एकनाथ भिंगोले यांनी आभार मानले.
ग्रामीण भागात बसेस सुरू कराव्यात
अहमदपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने शहरासाठी बसेस सोडल्या जात आहेत. त्याच धर्तीवर ग्रामीण भागात बसेस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह नागरिकांमधून केली जात आहे. महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत अहमदपूर आगार व्यवस्थापनाला निवेदनही देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.