राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी शहर महानगरपालिका कार्यालयात जाऊन महानगरपालिका अधिकारी, पदाधिकारी यांची कोविड-१९ संदर्भात बैठक घेऊन महानगरपालिकेकडून शहरात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतला. यावेळी पालकमंत्री म्हणाले, महापालिका कोविड केअर सेंटरमधील ऑक्सिजेनेटेड आणि वेंटिलेटर बेडची संख्या वाढवावी, महापालिकेच्या वतीने मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ४ हजार रुपयांपर्यंत खर्च करण्यात येत आहे, हे जाहीर करावे. गॅस दाहिन्या कार्यान्वित कराव्यात, भविष्यातील गरज लक्षात घेऊन शहरातील आरोग्य व्यवस्था सक्षम करावीत, दोन प्रभागांसाठी १ या प्रमाणात ३० बेडची रुग्णालये उभारावीत, या ३० पैकी ५ बेड वेंटिलेटर १५, बेड ऑक्सिजनेटेड तर १० बेड सर्वसाधारण असावेत, आदी सूचना करून महापालिकेच्या या मोहिमेत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
बैठकीदरम्यान महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर शहरातील स्मशानभूमीत सध्या असलेल्या व आवश्यकता असणाऱ्या गॅस दाहिनी, लसीकरण करण्यासाठी आवश्यक लस पुरवठा, ऐनवेळी गंभीर रुग्णास डीपीडीसी सेंटरमधून व्हेंटिलेटर उपलब्धतेबाबत माहिती दिली. आयुक्त अमन मित्तल यांनी लातूर शहरातील गौतमनगर, प्रकाशनगर भागातील वाढती रुग्णसंख्या, गांधी मार्केट भागात रॅपिड टेस्ट सुरू करणे, उपलब्ध खाजगी हॉस्पिटल, येत्या काळात शहरात असलेल्या सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची रॅपिड टेस्ट केली जाणार, शहरातील कोविड केअर सेंटरमधील सध्याची रुग्णसंख्या व दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा सुविधा, ऑक्सिजन बेड संख्या, उपलब्ध ऑक्सिजन साठा या बद्दलची माहिती दिली. उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विरोधी पक्षनेते दीपक सुळ, उपायुक्त शशी नंदा, शैला डाके, मयुरा शिंदेकर, मंजूषा गुरमे, सह आयुक्त वसुधा फड, सह आयुक्त सुंदर बोंदर, डॉ. महेश पाटील, क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, संजय कुलकर्णी, समाधान सूर्यवंशी, डॉ. माले यांच्यासह विभागप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.