येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत १७० निवासी डॉक्टर आहेत. यामध्ये एमडी, एम.एस अभ्यासक्रम पूर्ण करणा-या डॉक्टरांचा समावेश आहे. गतवर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे १७० पैकी बहूतांश निवासी डॉक्टरांना कोविड सेंटरमध्ये सेवा द्यावी लागली. रुग्णसंख्या कमी झाल्याने ५० निवासी डॉक्टर कोविड वार्डामध्ये कार्यरत होते. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे बहूतांश निवासी डॉक्टरांना पुन्हा सेवा द्यावी लागणार असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे सर्जिकलसह महत्वाचा प्रॅक्टीकल सराव राहिलेला आहे. त्यामुळे अभ्यास कधी पूर्ण करणार असा सवाल निवासी डॉक्टरांमधून उपस्थित होत आहे.
निवासी डॉक्टरांच्या प्रतिक्रिया...
कोविड काळात निवासी डाॅक्टरांनी कोविड वार्डात सेवा बजावली. वर्षभरात कोरोना व्यक्तीरिक्त इतर विषयांचे प्रॅक्टीकल बंद होते. त्यामुळे अभ्यासावर परिणाम झाला आहे. निवासी डॉक्टरांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. - गिरीश बोरकर, अध्यक्ष मार्ड
कोविडमध्ये शिक्षणशास्त्र आणि शस्त्रक्रिया बाजुला ठेऊन निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विशिष्ट विषयाचा अभ्यास सोडून काम केले. एक वर्षाचा कालावधी झाला तरी पुरेेसे मनुष्यबळ उभारलेले नाही. त्यामुळे रहिवासी डॉक्टरांना शिक्षण सोडून कोविडमध्ये काम करणे योग्य आहे का? - प्रतिक थानवी, सचिव मार्ड