लातूर : लातूर तालुक्यातील रायवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसविण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानसभेत मंगळवारी केली.
रायवाडी येथील पुतळा प्रकरणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. मात्र पीठासीन अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव मांडण्यास नकार दिला. तरीही आ. निलंगेकर यांनी किमान ठरावाचे वाचन करू द्यावे, अशी मागणी करीत ठरावाचे वाचन केले.
रायवाडी येथे सार्वजनिक वर्गणीतून २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. स्थानिक पातळीवर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून ग्रामपंचायतीमार्फत नाहरकत प्रमाणपत्र मिळाले होते. पुतळ्याबाबत कोणा व्यक्ती अथवा संघटनेची तक्रार नसताना २५ फेब्रुवारी रोजी पुतळा काढण्यात आला. गावकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा, पुतळा काढू नये अशी विनंती केली. परंतु, तहसीलदारांनी पुतळा काढण्यासाठी घाई केली. त्यांना कोणाचे आदेश होते, असे प्रश्न ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित केले जात आहेत. या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पुतळा ज्या जागेत होता, त्या ठिकाणी बसविण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी केली. ज्यांच्यामुळे महाराष्ट्र घडला आहे, अशा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय विधानसभेत मांडू न देणे हाही जनतेचा अवमान असल्याचे निलंगेकर म्हणाले.