रिंग रोड परिसरात रस्त्यावर कचरा
लातूर : एमआयडीसी परिसरातील ५ नंबर चौक ते पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या समांतर रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या वतीने नियमित कचरा उचलला जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. अनेक वसाहतींमधील लोकही रस्त्यावर कचरा आणून टाकत आहेत, तसेच मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
उड्डाणपुलावरील केबल काढण्याची मागणी
लातूर : शहरातील मुख्य चौकातील उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पुलावरून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. पथदिव्यांच्या पोललाही केबल गुंडाळलेले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. सदरील केबल काढण्याची मागणी होत आहे.
पोलीस प्रशासनाकडून कारवाई मोहीम
लातूर : शहरातील विविध चौकांत पोलीस प्रशासनाच्या वतीने कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर विरोधात धडक मोहीम राबविली जात आहे. गंजगोलाई, महात्मा गांधी चौक, रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, बार्शी रोड, राजीव गांधी चौक, औसा रोड आदी भागांत स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत, तसेच नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवरही दंडात्मक करवाई केली जात असल्याचे शहर वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.
बस स्थानक परिसरात सुविधांचा अभाव
लातूर : मध्यवर्ती बस स्थानक, तसेच रेणापूर नाका परिसरातील बस स्थानक परिसरात सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचाही अभाव या ठिकाणी दिसून येत आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याचे बस स्थानकातील चित्र आहे. याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आजपासून आरटीई ऑनलाइन अर्ज
लातूर : आरटीई प्रवेशासाठी बुधवारपासून ऑनलाइन अर्ज सुरू होत आहेत. २१ मार्च अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून, जिल्ह्यात २३८ शाळांमधील १,७४० जागांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. २१ मार्चनंतर राज्यस्तरावर एकच सोडत काढली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय सेतू केंद्रावर पालकांची गर्दी दिसून येत आहे.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रीनिंग
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत जिल्ह्यातील ५ वी ते १२वीचे वर्ग सुरू झाले आहेत. शाळांच्या वतीने खबरदारी म्हणून शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे, तसेच एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जात असून, मास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात आहे.