कोरोना कालावधीत जनजीवन पूर्णतः ठप्प झाले होते. त्यामुळे तीन महिन्यांत मीटर रीडिंग न घेताच अव्वाच्या सव्वा ॲव्हरेज हजारो रुपयांचे बिल आकारण्यात आले आहे. ते वीज बील माफ करण्यात येणार असल्याची घोषणा महावितरण मंत्रालयाकडून करण्यात आली होती. परंतु, वीज बिल माफ करणे दूरच राहिले. वीज बिल भरणा करण्यासाठी सवलत सुद्धा दिली जात नाही, तर थेट विद्युतपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे येथील भाजप तालुका शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले असून, उपविभागीय अभियंता जोंधळे यांना कोरोना कालावधीतील वीज बिलाची सरसकट माफी देण्यात यावी, सक्तीची वसुली तत्काळ थांबविण्यात यावी. कोणत्याही वीज ग्राहकाचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात येऊ नये. यासह मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर मंगेश पाटील, माधव बिरादार, संतोष शेटे, पंकज रक्षाळे, गणेश सलगरे, संतोष डोंगरे, उमाकांत देवंगरे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वाढीव वीज बिल विरोधात महावितरण कार्यालयासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST