गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गास आळा घालण्यासाठी लाॅकडाऊन लागू करण्यात आला होता. या काळात एस.टी.ची तब्बल दोन महिने प्रवासी वाहतूक सेवा ठप्प होती. परिणामी एस.टी.चे उत्पन्न थांबलेले होते. उत्पन्न वाढविण्यासाठी एस.टी.ने मे महिन्यापासून मालवाहतूक सेवेला सुरुवात केली. शेतकरी, व्यापाऱ्यांचा प्रतिसाद पाहता ट्रकची संख्या वाढवून २२ करण्यात आली. मे २०२० ते मार्च २०२१ या अकरा महिन्यांच्या कालावधीत मालवाहतुकीच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाच्या लातूर विभागाला १ कोटी ८१ लाख ६६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सदरील २२ मालवाहतूक ट्रकने ४ लाख ४१ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. परिणामी, कोरोनाकाळात होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी महत्त्वाचा हातभार लागला आहे. ट्रकमधून जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी अशा धान्याची वाहतूक केली जात आहे. त्याचबरोबर किराणामाल, पशुखाद्य, बियाणे, सिमेंटची वाहतूक केली जात आहे. जिल्ह्यात शेतकरी सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असतात. शेतकऱ्यांनी एसटीकडे ट्रकची मागणी केल्यानंतर ट्रक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहे. माल भरल्यानंतर सुरक्षित थेट ऑईल मिलवर पोहोचविला जात आहे. मालवाहतूक ट्रकसाठी महामंडळाने दिलेला दर हा अन्य मालवाहतुकीपेक्षा कमी आहे. एखादा शेतकरीही त्याच्याकडे जास्त शेतमाल असेल तर त्यासाठी या ट्रकचा उपयोग करू शकतो. त्यामुळे शेतकरी, व्यापारी सेवेचा लाभ घेत आहेत.
लातूर विभागात २२ ट्रकद्वारे मालवाहतूक...
राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात सध्या २२ मालवाहतूक ट्रक आहेत. यामध्ये लातूर आगारात १६, उदगीर ४ तर अहमदपूर येथील २ ट्रकचा समावेश आहे. दरम्यान, या उपक्रमातंर्गत आतापर्यंत ४ लाख ४१ हजार किलोमीटरचा प्रवास मालवाहतूक ट्रकने केला आहे. व्यापारी, शेतकरी, उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर जिल्ह्यांतही मालवाहतूक केली जात आहे. त्यामुळे अकरा महिन्यांच्या कालावधीत एस.टी. महामंडळाला १ कोटी ८१ लाख ६६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे लातूर विभागाचे अभय देशमुख यांनी सांगितले.