लातूर : जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने रॅपिड आणि प्रयोगशाळेतील चाचण्यांवर अधिक भर दिला जात आहे. दररोज दीड ते दोन हजार व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी केली जात आहे. यासाठी शहर महापालिकेच्या वतीने शहरात सहा ठिकाणी चाचणी केंद्रेही कार्यान्वित करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ७५४ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २४ हजार ९७३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या १ हजार ६४ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी ६७६ जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, मार्च महिन्यापासून रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने बाधित व्यक्तीच्या संपर्कातील जवळपास २० ते २५ व्यक्तींची तपासणी केली जात आहे. लातूर शहरातही मनपाच्या वतीने कोविड चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर तपासणीसाठी गर्दी दिसत आहे.
लातूर शहरात बाहेरगावाहून आलो असल्याने योग्य ती खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करण्यासाठी पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन वसतिगृह येथे आलो आहे. लक्षणे नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून कोरोना चाचणी आवश्यक आहे. नागरिकांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी. बाहेरून प्रवास करून आल्यानंतर चाचणी करून घ्यावी.
- तपासणीसाठी आलेले व्यक्ती
आमच्या संपर्कातील मित्र बाधित आढळल्याने कोरोना चाचणी करण्यासाठी आलो आहे. मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर करावा. बाहेर फिरताना मास्क नियमित वापरावा. आपल्या संपर्कातील व्यक्ती बाधित आढळल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
- तपासणीसाठी आलेली व्यक्ती