सध्या बाजारपेठेत १५ हजार क्विंटलच्या जवळपास आवक होत आहे. दरवर्षी ही आवक २२ हजार क्विंटलपेक्षा अधिक असते. आवक घसरल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीन तेल व पेंढीला मागणी वाढल्याने दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोयाबीनला ३ हजार ८८० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असला तरी यंदा त्यापेक्षा अधिक दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे.
कमाल दरात २२३ रुपयांनी वाढ...
बाजार समितीत १ फेब्रुवारी रोजी १५ हजार ३१८ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन कमाल भाव ४ हजार ५४०, सर्वसाधारण ४ हजार ४६० तर किमान ३ हजार ७७१ रुपये मिळाला होता. गेल्या तीन दिवसांपासून १५ हजार क्विंटलच्या जवळपास आवक होत आहे. १२ फेब्रुवारी रोजी कमाल ४ हजार ७६१, सर्वसाधारण ४ हजार ६५० तर किमान ४ हजार ३० रुपये, १३ रोजी कमाल ४ हजार ७६३, सर्वसाधारण ४ हजार ६५०, किमान ४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
आणखीन भाव वाढण्याची अपेक्षा...
सध्या बाजारात सोयाबीनची आवक घटली आहे. त्याचबरोबर सोयाबीन तेल आणि पेंढीच्या दरात वाढ झाल्याने सोयाबीन दरात वाढ होत आहे. आणखीन शंभर रुपयांपर्यंत भाव वाढण्याची शक्यता आहे.
- ललितभाई शहा, सभापती, बाजार समिती.
तेलाचे दर वाढल्याने भाववाढ...
काही वर्षांपासून सोयाबीनचे उत्पादन वाढले असले तरी सूर्यफूल, करडी, भुईमुगाचा पेरा कमी झाला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या तेलाला मागणी अधिक आहे. सोयाबीन तेलाचे दर वाढल्याने भाव वाढले आहेत.
- पांडुरंग मुंदडा, अध्यक्ष, श्री ग्रेन सीडस् ॲण्ड ऑईल मर्चंट असो.