उदगीर : येथील मार्केट यार्डात मंगळवारी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला असून, मागील पाच दिवसांत सोयाबीनच्या दरात ३ हजार रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी, सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांच्या पदरी निराशा आली आहे. अचानक दर घसरल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
मागील हंगामाच्या शेवटी सोयाबीनला विक्रमी १० हजाराचा दर मिळाल्याने शेतक-यांच्या आशा वाढल्या होत्या. परिणामी, उदगीर तालुक्यात ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. मृग नक्षत्राने तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. वाढलेले दर पाहता शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली होती. जुलै महिन्यात पावसाच्या खंडामुळे शेतकरी चिंतेत पडलेला होता. परंतु, ऑगस्ट महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक बहरले होते. शेतकऱ्यांनी महाग औषध खरेदी करून फवारणी करीत पिक जगविले. जुन व जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या राशी सुरू झाल्या आहेत. बाजारात सोयाबीनची आवक सुरू झाली तेव्हा सुरुवातीला उदगीरच्या बाजारात नवीन सोयाबीनला ८ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. त्यातच काही बाजारात ११ हजार ते १६ हजारापर्यंत दर मिळत असल्याचे संदेश फिरत असल्याने शेतक-यांनी राशी करण्याची घाई केली. मजुरदारांनी सोयाबीन कापणीची दर मागील वर्षीपेक्षा दीडपट वाढ केली आहे. मागील वर्षी २२०० ते २५०० प्रती एकरी असणारे यंदा ३५०० ते ४ हजार एकरी कापणीचा खर्च येत आहे. त्यातच मागील पाच दिवसांमध्ये वायदे बाजारात घसरण होत असल्याने त्याचा परिणाम प्रत्यक्ष बाजारपेठेवर पहावयास मिळत आहे. केंद्र सरकारने सोयाबीनच्या पेंडीची आयात करण्यास परवानगी दिल्याने स्थानिक बाजारपेठेतील भाव घसरणीला कारणीभूत ठरल्याचे व्यापारी सांगत आहेत.
ग्रामीण भागात राशीला सुरुवात...
बाजारपेठेमध्ये नवीन सोयाबीनची आवक सुरू झालेली आहे. कारखानदारांकडून सुरुवातीला चांगल्या दराने सोयाबीनची खरेदी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. त्यातच मागील आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेले सोयाबीनच्या आता राशीला सुरुवात झालेली आहे. बाजारात चांगला दर मिळेल या आशेने शेतकरी मंगळवारी सोयाबीन घेऊन आले. परंतु, वायदे बाजारात जबरदस्त घसरण झाल्याने त्याचा परिणाम बाजारात पहावयास मिळाला. त्यामुळे दरात घसरण झाली असून, शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
पावसामुळे वाढली शेतक-यांची चिंता...
पाच दिवसांत साेयाबीनचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटलने घसरले आहेत. प्रांरभी चांगला दर मिळत असल्याने शेतक-यांनी जून, जुलैमध्ये पेरणी केलेल्या सोयाबीनच्या काढणीला सुरुवात केली आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाने पावसाची शक्यता सांगितली असल्याने शेतक-यांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. सोयाबीनच्या वाढत्या दरामुळे तालुक्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला होता. मात्र, दरात घसरण झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.