यात्रेनिमित्त रहाटपाळण्यांच्या व्यवसायातील श्री सिद्धेश्वराच्या यात्रेसाठी ३५ यात्रेकरू छत्तीसगडहून आले होते. शिवाय अमरावती जिल्ह्यातून खेळण्या विक्रीचा व्यवसाय करणारे १४ कुटुंब गतवर्षी लॉकडाऊनमध्ये लातुरात अडकले होते. त्यांना त्यांच्या गावातील अवस्था कशी असेल, याची चिंता सतावत असतानाच त्यांचा गावाकडे जाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, श्री सिद्धेश्वर देवस्थानने या सर्व यात्रेकरूंची यात्री निवासात भोजनासह राहण्याची व्यवस्था केली. देवस्थान समिती या पाहुण्यांच्या दिमतीला होती. दोनवेळचे जेवण, चहा-नाश्ता त्यांना दिला जात असे. लॉकडाऊन संपल्यानंतर महानगरपालिका आणि देवस्थानच्या वतीने त्यांना गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आम्ही अमरावतीहून आलो, गावोगावी जाऊन चिमण्यांच्या खेळण्या विकून पोट भरतो. खेळण्या विकत विकत आम्ही येथे आलो आणि अडकून पडलो. इथली माणसे चांगली आहेत. काम न करता जेवण देत आहेत, अशी भावना अमरावतीच्या खेळण्या विक्रेत्यांनी व्यक्त केली हाेती.
तर इकडे लातूर शहरातील निराधारांनाही देवस्थानने एकत्र करून यात्री निवासात आणले. शहरात लॉकडाऊन असल्यामुळे त्यांची उपासमार होती. परंतु, सिद्धेश्वर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी या निराधारांची होणारी उपासमार लक्षात घेऊन त्यांनाही घास भरवला. गंजगोलाई, पाच नंबर चौक, शिवाजी चौक व रस्त्याने इकडून-तिकडे फिरत राहणाऱ्या निराधारांना महापालिकेच्या सिटी बसमध्ये मंदिराच्या यात्री निवासात मुक्कामी हलविण्यात आले. तिथे त्यांच्या जेवणाची, राहण्याची सोय केली. श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या मदतीने या निराधारांना लॉकडाऊन संपेपर्यंत मायेचा आधार देण्यात आला. महापौर विक्रांत गोजमगुंडे, तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत त्यांच्या देखरेखीबाबत सतर्क होते.