लातूर : ऑलिम्पिक खेळ प्रकार असलेला नेमबाजी खेळ तसा महागडाच. त्यातच अनेक वर्षे शूटिंग रेंज नसल्याने लातूरचे खेळाडू पुणे, मुंबईचा आधार घेत खेळत असत. आता लातुरातच शूटिंग रेंज झाल्याने या खेळाचे खेळाडू चमकू लागले आहेत. क्रीडा संकुलात झालेल्या रेंजच्या माध्यमातून नवोदित नेमबाज उदयास येत असून, प्रथमच लातुरात सराव करून पश्चिम विभागीय स्पर्धेपर्यंत धडक मारण्याची लातूरच्या खेळाडूंची पहिलीच वेळ आहे. एकाग्रतेसाठी प्रसिद्ध असलेला नेमबाजी खेळ मोठ्या शहरातच पाहावयास मिळतो. या खेळाचे साहित्यही महागडे. त्यामुळे सर्वसामान्य खेळाडूंना परवडणारे नाही. त्यातच शूटिंग रेंजचा अभाव. अशा संकटातून बाहेर पडत लातूरच्या दोन खेळाडूंनी यश संपादन केले आहे. पनवेल येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्यनिअर शूटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकरात दिनेश रणधीर सलघंटे व विनोद वलसे यांनी चमकदार कामगिरी करत मध्यप्रदेशातील भोपाळ येथे हाेणा-या पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. लातूरच्या खेळाडूंनी यापूर्वी मोठ्या शहरांचा आधार घेत या खेळात आपले कौशल्य सादर केले आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज जागृती चंदनकेरे हिने पुण्यात सराव करून या खेळात चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघात निवड झालेली ही लातूरची एकमेव खेळाडू आहे. त्यानंतर आता प्रथमच लातुरात सराव करून राज्य स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पश्चिम विभागीय स्पर्धेत निवड झालेली लातूरच्या खेळाडूंची पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, दादरा व दीव-दमणचे खेळाडू सहभागी होणार आहेत. एकंदरीत लातूरच्या खेळाडूंना दैनंदिन सरावासाठी शूटिंग रेंज मिळाल्याने हा निकाल पाहावयास मिळत आहे.
चमकदार कामगिरी...
राज्य स्पर्धेत पात्रता मिळविण्यासाठी ४०० पैकी ३५० गुण आवश्यक असतात. दिनेश सलघंटे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत ३६१, तर विनोद वलसेने ३५७ गुण मिळवित आपली निवड पक्की केली. विशेष म्हणजे दिनेश सरावासाठी दररोज निलंगा येथून क्रीडा संकुलात ये-जा करतो. एंकदरीत लातुरात सराव करून मिळविलेले हे लातूरकरांसाठी पहिलेच यश आहे. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय नेमबाज जागृती चंदनकेरे हिचे मार्गदर्शन लाभले आहे.
दहा मीटरच्या तीन लेन...
क्रीडा संकुलात गेल्या तीन वर्षांपासून शूटिंग रेंज साकारण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा विभाग व स्कायलार्क रेंजच्या माध्यमातून प्रशिक्षण सुरू असते. बहुउद्देशीय इमारतीत असलेल्या या ठिकाणी दहा मीटर रेंजच्या तीन लेन आहेत. या ठिकाणी सकाळ, सायंकाळच्या सत्रात खेळाडू सराव करतात. भविष्यात २५ मीटर व ५० मीटर रेंजचे हॉल उपलब्ध व्हावेत, अशी अपेक्षा लातूरच्या नवोदित नेमबाजांची आहे.